नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून ते चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचे सांगितले. आर्थिक वर्ष 2021मध्ये जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणतेही बदल केले नाहीत तसेच डिसेंबर 2020पासून ग्राहकांना कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा केली. भारतीय वित्तीय बाजारातील तरलता
वाढविण्यासाठी काही क्षेत्रांना आर्थिक मदत देणे, निर्यातीस चालना देणे आणि पेमेंट सर्व्हिस सिस्टमच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास सुलभता निर्माण करून देणे यासारख्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोलाची मदत केली जात आहे. मार्च 2022पर्यंत रिझर्व्ह बँकेने एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद केली आहे.
दरम्यान, समोर आलेल्या आकडेवारीवरून चांगले संकेत मिळत असल्याचे गव्हर्नर दास म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थादेखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक देशांमध्ये उत्पादन, रिटेल विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे तसेच निर्यातीतही सुधारणा झाली आहेे. आम्ही भविष्याबाबत विचार करीत आहोत आणि सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती दिसून येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जिद्दीने पुढे जाऊ : दास
कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे अनेक गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे, परंतु आमची पुढे जाण्याची जिद्द कायम आहे. सध्या आव्हाने कायम आहेत, पण आपण त्यांना नक्कीच पार करू. आपण कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम दूर करून पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर जाऊ असा मला विश्वास आहे, असे या वेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …