Breaking News

वाढते तापमान पाळीव जनावरांच्या जीवावर

काळजी घेण्याचे पशुवैद्यकीय विभागाचे आवाहन

महाड : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, त्याचा फटका मानवी जीवांबरोबर पाळीव जनावरांनादेखील बसू लागला आहे. पाळीव जनावरांना उष्माघात आणि कोल्डस्ट्रोकची बाधा होत आहे. शेतकर्‍यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. ग्लोबलवॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रति वर्षी वाढतच चालले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसात कोकणातदेखील कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान 35 ते 40अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या उष्म्याचा फटका जसा मानवी जीवनाला बसत आहे, तसाच पाळीव जनावरांनादेखील बसत आहे. कोकणात ऐन उन्हाळ्यात जनावरे मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. तर काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात, यामुळे कोल्डस्ट्रोक येतो आणि जनावर दगावले जाते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वनव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते अन्न खातात. अनेकवेळा लग्न सोहळ्याच्यावेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्यानेदेखील जनावरांना विषबाधा होते. बकर्‍या, कोंबड्या यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो.

शेतकर्‍यांनी आपली जनावरे सकाळी 10च्या आत गोठ्यात आणली पाहिजेत. शिवाय जनावरांना चांगले पाणी आणि चारा वेळेवर दिला पाहिजे. लसीकरण आणि वेळीच उपचार करून घेतल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.

-डॉ. डी. एस. सोनावले, सहआयुक्त, पशुवैद्यकीय केंद्र – महाड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply