बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरून फडणवीस संतापले
नागपूर ः प्रतिनिधी
कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणीतरी चुकीचे सल्ले देत आहे. पोरखेळ चालला असून, मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
बुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत करायचे ठरवले तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता 500 कोटींमध्ये होणार्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भुर्दंड बसेलच, शिवाय त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळजवळ पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे हे शक्य नाही. सरकारचे सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
‘आरे’मध्ये कारशेड उभारायचे नाही हे महाविकास आघाडी सरकारने आधीच निश्चित केल्याने पर्यायी जागेचा विचार सुरू झाला. सरकारच्या निर्देशानुसार मेट्रा कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याचा आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांनी दिला होता, मात्र कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे कांजूरमार्ग येथील जागा घाईघाईत हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.