जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना तसेच सुधारणा करीत आहे. बंदराच्या निरंतर विकास आणि विस्तारामुळे जेएनपीटीला राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीतही कोविड 19चा उद्रेक आणि लॉकडाऊनच्या आव्हानांच्या परिणामावर विजय मिळवून जेएनपीटी अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून कार्यरत राहिले आहे. तसेच जेएनपीटीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करून जागतिक पुरवठा साखळी सक्रिय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या लॉकडाऊनने देशाच्या अर्थव्यवस्थेत शिपिंग सेक्टरची अपरिहार्य भूमिका अधोरेखित केली आहे. जेएनपीटीने लॉकडाऊनदरम्यान 22 मार्च ते 24 मे या कालावधीत 610,405 टीईयू आणि 913,233 मे. टन लिक्विड आणि बल्क मालाची वाहतूक केली आहे.
नियमित ऑपरेशन्स व्यतिरिक्त जेएनपीटीने या आव्हानात्मक काळात आयात-निर्यात ग्राहक आणि भागधारकांना पाठिंबा दिला आहे. जेव्हा ट्रकांच्या तीव्र कमतरतेमुळे डीपीडी ग्राहक त्यांची डिलिव्हरी घेण्यास असमर्थ होते, तेव्हा जेएनपीटीने त्यांना आयसीडी मुलुंड आणि आयसीडी तारापूर येथे विस्तारित गेट सुविधा उपलब्ध करून देऊन आणि कोणतेही अतिरिक्त शिफ्टिंग शुल्क न घेता त्यांचे कंटेनर तेथे रेल्वेने पाठवून साह्य केले आहे. 13 एप्रिलपासून 25 मेपर्यंत एकूण 77 ट्रेन्सच्या माध्यमातून डीपीडी कंटेनरच्या अतिरिक्त 5,538 टीईयूची हाताळणी केली आहे. जेएनपीटीने आजूबाजूच्या बंदरांत निर्यात बंद असतानाही हाजीरा येथील निर्यातदार ग्राहकांना साह्य केले. एप्रिल 2020पासून जेएनपीटीने जेएन पोर्ट आणि दहेज/हजीरादरम्यान आयात-निर्यात कंटेनरची रेल्वेद्वारा वाहतूक सुरू करून 3909 आयात-निर्यात कंटेनरची हाताळणी केली. 6 मेपासून जेएनपीटीच्या स्वतःच्या कंटेनर टर्मिनलने रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी आयसीडी दहेजपर्यंत कॉनकोरच्या माध्यमातून रेल्वेद्वारे रिकामे कंटेनर पाठविण्याची सुविधा सुरू केली.
वेळेवर केलेल्या या उपाययोजनांमुळे निर्यातदारांना मदत झाली तसेच जेएनपीटीची आंतर्देशीय कनेक्टिव्हिटी मजबूत झाली. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी भा. प्र. से. म्हणाले की, जेएनपीटी अशा प्रसंगी नेहमीच सर्वांत पुढे असते. जेएनपीटी हे भारताचे क्रमांक एकचे कंटेनर पोर्ट आहे व गेल्या 31 वर्षांपासून अनेक वेळा अशा प्रकारची कामे केली आहेत. पुरवठा साखळीचा महत्त्वपूर्ण भाग बनत आपले कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेला कायम पाठिंबा देण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात असंख्य उद्योग पूर्णपणे ठप्प झाले असताना जेएनपीटीचे कार्य निरंतर सुरू होते. जेएनपीटीने या कठीण काळात वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा, इंधन आणि अन्न यांसारख्या महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरू ठेवले होते.
कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा सर्वाधिक धोका असूनही अभूतपूर्व अशा या संकटावेळी जेएनपीटीचे कर्मचारी, भागधारकांचे समर्थन आणि वचनबद्धता ही शौर्य आणि कठोर परिश्रमाची कहाणी बनली आहे. जेएनपीटीने आपल्या कामकाजाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत आणि सध्या राबविण्यात येत असलेले मोठमोठे प्रकल्प व उपक्रमांमुळे जेएनपीटी परिवर्तनाचा पुढचा टप्पा नक्कीच गाठेल आणि जागतिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वोत्तम बंदरांच्या तुलनेत आपल्या सेवांचा दर्जा उंचावेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-जनसंपर्क अधिकारी, जेएनपीटी