चेन्नई : वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने दुसर्या दिवसअखेर 8 बाद 555 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसे यश मिळाले, पण रूटच्या धमाकेदार खेळीमुळे इंग्लंडने पहिल्याच डावात धावांचा डोंगर उभारला.
जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसर्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी 92 धावांची भर घातली. त्यानंतर दुसर्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक, तर रूटने दीडशतक ठोकले. स्टोक्स फटकेबाजी करीत असताना झेलबाद झाला. त्याने 10 चौकार आणि तीन षटकार खेचले. रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. तो 19 चौकार व दोन षटकारांसह 218 धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (34), बटलर (30) हे झटपट बाद झाले. मग डॉम बेस (28) आणि जॅक लीच (6) यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.
भारतीय गोलंदाजी सुमार ठरली. कर्णधार विराट कोहलीने तीनही डीआरएस चुकीचा निर्णय घेऊन गमावल्याचा फटका बसला. त्यात दोन झेल सुटले व एक सोपा रन आऊटही भारतीय क्षेत्ररक्षकांना करता आला नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड चार कसोटी सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत पोहचेल. न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ कोण असेल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
इंग्लंडच्या कर्णधाराने रचला इतिहास
आपला 100वा कसोटी सामना खेळणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दमदार खेळीच्या जोरावर द्विशतकी मजल मारली. त्याने 19 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने द्विशतक ठोकले. 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणारा रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याशिवाय रूटने आणखी दोन विक्रमही केले. चेन्नईच्या कसोटीत रूटने कसोटी कारकिर्दीत दहाव्यांदा दीडशतकी मजल मारली आणि विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली तसेच सलग तिसर्यांदा दीडशतकी मजल मारणारा तो सातवा फलंदाज ठरला आहे. अश्विनला षटकार मारत त्याने आपले दुहेरी शतक पूर्ण केले. रूट हा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे की त्याने षटकार खेचत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. हे रूटचे देशाबाहेर तिसरे दुहेरी आणि शेवटच्या तीन कसोटीतील दुसरे दुहेरी शतक आहे.