Breaking News

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर जोकोव्हिचचेपुन्हा एकदा वर्चस्व  

मेलबर्न : वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा सरळ तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. जोकोव्हिचचे हे कारकिर्दीतील 18वे, तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले.
33 वर्षीय जोकोव्हिचने आपल्या दमदार सर्व्हिस, तसेच जोरदार फटक्यांनिशी मेदवेदेवचे आव्हान परतवून लावले. जोकोव्हिचने अखेरीस 13पैकी 11 गेम जिंकले. त्यामुळे त्याने 7-5, 6-2, 6-2 अशा दमदार विजयासह जेतेपद आपल्या नावावर केले. मेलबर्न पार्कवरील त्याचे हे सलग तिसरे जेतेपद ठरले.
जोकोव्हिचने गेल्या 10पैकी सहा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून, 8 मार्चपर्यंत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर शिक्कामोर्तब केले आहे. कारकिर्दीत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार्‍या चौथ्या मानांकित मेदवेदेवला मात्र या वेळीही जेतेपदाचे स्वप्न साकार करता आले नाही. यासह जोकोव्हिचने मेदवेदेवची सलग 20 सामन्यांची विजयाची मालिका खंडित केली.
जोकोव्हिचने पहिल्या 10 मिनिटांतच 3-0 अशी आघाडी घेतली होती, पण मेदवेदेवने त्याला कडवी लढत देत चांगलेच झुंजवले. 6-5 अशा स्थितीतून जोकोव्हिचने तीन सेटपॉइंट मिळवले होते, मात्र तिसर्‍या प्रयत्नात मेदवेदेवचा फटका नेटवर आदळल्याने जोकोव्हिचने पहिला सेट आपल्या नावावर केला.
दुसर्‍या सेटच्या पहिल्याच गेममध्ये मेदवेदेवने जोकोव्हिचची सर्व्हिस भेदत पुनरागमन केले, पण जोकोव्हिचने त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत पुढील चार गेम जिंकत दुसर्‍या सेटवर वर्चस्व प्रस्थापित केले. तिसर्‍या सेटमध्येही जोकोव्हिचचाच बोलबाला पाहायला मिळाला.
पोलासेक-डॉगिगला पुरुष दुहेरीचे जेतेपद
फिलिप पोलासेक आणि इव्हान डॉगिग या जोडीने गेल्या वर्षीच्या विजेत्या राजीव राम आणि जो सालिस्बरी जोडीवर मात करीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. पोलासेक-डॉगिग जोडीने ही लढत 6-3, 6-4 अशी सहज जिंकत जेतेपदावर नाव कोरले.

चांगला खेळ करणार्‍यालाच विजय मिळवता येतो. कठोर परिश्रम घेणार्‍या प्रत्येकाचा मी सन्मान राखतो. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो.

– नोव्हाक जोकोव्हिच

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply