मोहोपाडा : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.
शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण भालेकर, लखन पवार, प्रसाद जाधव, जितेंद्र कदम, बबन झोरे, शरद मालकर, मंदार उतेकर व केतन भद्रीके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकार्य ट्रेकर्स गेली पाच वर्षे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी सातत्याने श्रमदान करीत आहेत.
दरम्यान, यावेळी शिवकार्य ट्रेकर्स खालापूरच्या माध्यमातून सोंडाई किल्यावर या वर्षीची ही चौथी मोहीम होती. सकाळच्या सत्रात गडाच्या पायथ्यापासून ते गडावर जाईपर्यंत योग्य जागी दिशादर्शक व सूचना फलक लावण्यात आले. दुपारच्या सत्रात पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून गडावर येणार्या वाटा व्यवस्थित करून पायथ्यापासून ते वरपर्यंत अस्ताव्यस्त पडलेला संपूर्ण प्लास्टिक कचरा तर मद्याच्या, बिस्लरी बाटल्या एकत्रित करून गडाच्या पायथ्याशी नेण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावली.
या मोहिमेत शिवकार्य ट्रेकर्सच्या 25 हुन अधिक दुर्गवीरांनी सक्रिय सहभाग घेत जागोजागी सूचना फलक लावून,पाण्याच्या टाकीतील कचरा काढून गडावर येणार्या वाटा व्यवस्थित करून संपूर्ण गड परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.