पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने पालिकेने पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढलेल्या सोसायट्या कोरोना बाधित क्षेत्र (कंन्टेमेंट झोन) म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली आहे. कामोठे, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील पाच किंवा पाच पेक्षा जास्त रुग्ण असणार्या सोसायट्या सील करण्यात आल्या आहेत.
कामोठे येथील क्रिस्टल प्लाझा, सतलज रेसिडन्सी, तिरूपती कॉम्लेप्स, प्रिशिअस रेसिडेन्सी, कळंबोली येथील प्लॅटिनम व्हिअर, एल.आय.जी., स्टील मार्केट, नवीन पनवेलमधील खांदा कॉलनीतील गार्डन व्ह्यू सोसायटी, पनवेलमधील साईनगर येथील मुनोत रिजन्सी, बी.डी.टी.ए अपार्टमेंट, खारघर येथील साई स्प्रिंग, सिमरन, महावीर हेरिटेज, गॅलेक्सी, हाईड पार्क या सोसायट्या कंन्टेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, सॅनिटायझर वापरणे, या त्रिसूत्रीचे पालन सर्वांनी करावे असे पालिकेच्या वतीने सातत्याने सांगितले जात आहे. गृह निर्माण सोसायटीमध्ये पाच किंवा पाच पेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असतील तर अशा सोसायटींनी महानगरपालिकेशी संपर्क साधवा, तसेच सोसायटीतील संबधित सदनिका सॅनिटाईझ करण्यासाठीदेखील पालिकेशी संपर्क साधावा, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.