रोहे : प्रतिनिधी
घटनात्मक दृष्टीने मतदान नोंदणी महत्वाची असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने मतदान नोंदणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साठे मॅडम यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. त्याला अनुसरून येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रोहा तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नुकताच नवमतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी नायब तहसीलदार साठे मॅडम मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी त्यांनी ऑफलाइन व ऑनलाइन मतदार नोंदणी पद्धतीची सविस्तर माहिती दिली.
नवमतदार नोंदणी कार्यक्रम 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन साठे मॅडम यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनंत थोरात यांनी केले. या कार्यक्रमात 30 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तर 20 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने नवमतदार म्हणून नोंदणी केली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कर्यक्रम अधिकारी व रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल, कार्यक्रम अधिकारी सीमा भोसले यांच्यासह विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रा. सुकुमार पाटील यांनी आभार मानले.