Breaking News

जागतिक तापमान वाढ व हवामान बदल

भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. भूशास्त्रीय पुरावे सांगतात की, भूतकाळातील तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळे होते. काही ठिकाणी जास्त तापमान, तर काही ठिकाणी अगदी कमी असे ते होते, पण सध्या जी तापमान वाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणार्‍या तापमान वाढीचे प्रमाण हे मानवनिर्मित घटनांतून होणार्‍या तापमान वाढीपेक्षा जास्त झाले आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे त्यांना वाटते.

हरितगृह परिणाम किंवा ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय? : हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते. त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणे हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान 30 अंशांनी कमी असले असते आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरले असते. या नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणार्‍या वायूंचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल म्हणतात. ग्रीनहाऊस गॅसेसमुळे होणार्‍या तापमानवाढीत सर्वाधिक वाटा हा पाण्याच्या वाफेचा असतो, पण हा परिणाम काही दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही, मात्र त्याच तुलनेत कार्बन डायऑक्साईड गॅसेस वातावरणात जास्त दिवस टिकतात. हा परिणाम पूर्णतः जाण्यासाठी किंवा औद्योगिक क्रांतिपूर्व अवस्था येण्यासाठी काही शतके लागू शकतील. त्यात भर म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो आणि याचा परिणाम समुद्री जीवसृष्टीवर होतो. इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. मानवी हालचालींमुळे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात, पण कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. 1750ला औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यापासून कार्बन डायऑक्साईड 30 टक्क्यांनी, तर मिथेनचे प्रमाण हे 140 टक्क्यांनी वाढले आहे. मागील अनेक वर्षांच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे.

जागतिक तापमानवाढीचा पुरावा काय?: काही लोक असे म्हणतात की, जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदल असे काही नसते, पण ती गोष्ट आहे याचे पुरावे वैज्ञानिकांनी दिले आहेत. गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान 0.8 डिग्रीने वाढले आहे आणि यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकांतच 0.6 डिग्रीने तापमान वाढले आहे. सॅटेलाइटचा डेटा असे दाखवतो की अलीकडच्या दशकात सागरी पातळीत वाढ झाली आहे. उष्णतेमुळे पाण्याचे प्रसरण होते. त्यातून ही पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. जसे वातावरण वाढते तसे आधी एकमेकांजवळ असणारे रेणू हे दूर जातात. त्यामुळे पाण्याची पातळी वाढते.त्याचबरोबर हिमनग वितळणे आणि हिमखंड वितळणे हेदेखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अंटार्टिकातील तसेच जगातील इतर भागातील बर्फ वितळत आहे. 1979पासून आर्टिक महासागरातली हिमक्षेत्र सातत्याने कमी होत आहेत. हिमक्षेत्र वर्षाला सरासरी चार टक्क्यांनी कमी होत आहेत. 2012मध्ये समुद्रातले हिमक्षेत्राचे प्रमाण विक्रमी पातळीवर घसरले होते. 1979 ते 2000 या काळातील सरासरीच्या तुलनेत ते 50 टक्के कमी होते. गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधील हिमखंड झपाट्याने वितळले जात आहेत. जर 2.8 दशलक्ष क्युबिक किमीचे हिमखंड वितळले, तर समुद्राची पातळी सहा मीटरने वाढेल. या हिमखंडांचे वस्तुमान घसरत असल्याचेही डेटा सांगतो. याआधी पूर्व अंटार्क्टिकातील बर्फाच्या तापमानात चढउतार होताना दिसत नव्हती, पण आता तिथेदेखील हे बदल घडत आहेत. काही ठिकाणी वस्तुमान वाढणे हेदेखील धोक्याचे लक्षण मानले जाते. हवामान बदलाचा फरक वनस्पती आणि वन्य प्राण्यांवर पडताना दिसतो. याचा परिणाम असा दिसत आहे की काही वनस्पतींना फुले लवकर लागत आहेत आणि फळेही लवकर येताना दिसत आहेत. प्राण्यांबाबतही फरक दिसत आहे.

कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण : वाढूनदेखील जागतिक तापमान वाढ झाली नसल्याचे काही वैज्ञानिक म्हणत आहेत. या स्थितीला ‘पॉज’ असे म्हणतात. ही गोष्ट वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितली आहे, पण नेमकी पॉजची प्रक्रिया काय हे गूढ अद्याप उकललेले नाही, मात्र ही प्रक्रिया थांबेल अशा दृष्टीने बदल होताना दिसत आहेत. पॉजची प्रक्रिया जेव्हा सातत्याने होते तेव्हा त्याला हायाटस म्हणतात. 2014, 2015, 2016 ही तीन वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे होती. सायन्स जर्नलने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार जून 2015मध्ये तापमानाचा अभाव होता हे अद्याप सिद्ध झाले नाही. 2013 साली प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने कॉम्प्युटर मॉडलिंगच्या आधारावर काही भाकिते केली आहेत. त्यापैकी काही सिद्धांत असे सांगत आहेत की 1850च्या तुलनेत 21व्या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात 1.5 डिग्रीने वाढ होईल. जागतिक तापमानवाढीची मर्यादा 2 डिग्रीच्या खाली ठेवावी हे उद्दिष्ट ठेवणेदेखील आता धोक्याचे ठरू शकते. जागतिक तापमानवाढीचे उद्दिष्ट 1.5 डिग्री ठेवणे हे सुरक्षित असल्याचे काही वैज्ञानिक म्हणत आहेत. आपल्याला जर 1.5चे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आपण ऊर्जेचा वापर कसा करतो, आपण जमीन कशी वापरतो आणि आपली वाहतूक व्यवस्था कशी असावी याबाबत आपल्याला आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील. जर आपण आपल्या ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनात कमालीची घट केली तरी वातावरणावर हे परिणाम होताना दिसत राहतील. बर्फ आणि पाण्याच्या मोठ्या साठ्यांवर झालेला सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी अनेक वर्षे लागतील, तसेच वातावरणातून हे वायू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी दशके लागतील. यामुळे काय बदल होतील हे आताच निश्चितपणे सांगता येणार नाही, असे वैज्ञानिक म्हणतात, पण त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. अन्नधान्य निर्मितीच्या प्रक्रियेत बदल होईल. नैसर्गिक आपत्ती जसे की पूर, वादळे, दुष्काळ, उष्ण वार्‍याच्या लहरीत होणार्‍या मृत्यूचे प्रमाण वाढेल. तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा होईल इतकेच आता सांगता येईल, पण एखादी घटना हवामान बदलाशी जोडणे हे क्लिष्ट आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply