पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक 75ची सेवा भाजप युवा मोर्चाने केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुरवठ्यामुळे पुर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) झाला. ही बस सेवा सुरू झाल्याने साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानक या मार्गावर प्रवास करणार्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले. साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानक ही एनएमएमटी बस नंबर 75ची सेवा कोरोना काळात दोन वर्षे बंद होती. ही बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने ही बससेवा पूर्ववत झाली आहे. या बस सेवेचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि प्रभाग समिती ‘क’च्या सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नितीन पाटील तसेच युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी प्रभाग क्रमांक 14चे माजी अध्यक्ष सचिन गमरे, अजय पाटील, युवा नेते निशांत पावस्कर, उमेश इनामदार, रूपेश आंबोलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील कुंदन, रोहित आठवणे, आकाश भाटी, शावेज रिझवी, ई श्रम कार्ड अभियानाचे कादीर शेख, शुभम कांबळे, सलीम शेख, संदीप टाक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.