Breaking News

केवनाळे येथेही दरडीखाली मृत झालेल्या

व्यक्तींच्या नातेवाईकावर ग्रामस्थांकडून हल्ला

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील केवनाळे येथे दरडीखाली आई, वडील गमावलेल्या व्यक्तीवर 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोघा जणांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी, चार मृतांच्या नातेवाईक असलेल्या तरुणावर तीन जणांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी हल्ला केला होता.

तळिये येथील दरडीखाली आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या प्रदीप कोंडाळकर (सध्या रा. कल्याण) यांना पुनर्वसन होणार्‍या आपद्ग्रस्तांची यादी मागितल्याच्या रागातून दीपक दगडू पवार (रा. पारमाची) याने 10 ऑक्टोबर रोजी शिविगाळ आणि त्याचा पुतण्या करण संतोष पवार याने कानफटीत मारून हल्ला केल्याचा अदखलपात्र गुन्हा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याच वेळी तालुक्यातील केवनाळे येथेही धोंडीराम सोनू दाभेकर (वय 38) यांच्यावर हल्ला केल्याची घटना चर्चेस आली आहे. धोंडीराम यांचे चुलत आजोबा गेनू दाभेकर, आजी इंदिराबाई दाभेकर, चुलत भाऊ सुनील  दाभेकर आणि चुलत वहिनी शिल्पा दाभेकर या चौघांचा 22 जुलै रोजी घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. पुनर्वसनाबाबत बैठक झाल्यानंतर ज्ञानोबा काशिराम दाभेकर, शिवाजी विठू दाभेकर आणि तुकाराम नारायण पवार या तिघांनी धोंडीराम यास शिविगाळ आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी धोंडीराम दाभेकर याने तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन दाखल केलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेला पाऊण महिना उलटूनही आरोपी पोलीस ठाण्यात हजर केले नाहीत. त्यामुळे धोंडीराम यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर आरोपींना काही राजकीय व्यक्तींनी पोलादपूर पोलीस ठाण्यात हजर केले.

अतिवृष्टी काळामध्ये केलेल्या बचाव व मदतकार्याबद्दल धोंडीराम दाभेकर याचा अलिबाग येथे स्वातंत्र्य दिनी सत्कार करण्यात आला होता. त्याच्यावर हल्ला करणार्‍या  आरोपींना राजकीय आश्रय मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply