दुबई ः वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळविला. मागील काही कालावधीपासून टीका होत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला अखेर सूर गवसला आणि त्याने लंकेविरुद्ध दमदार अर्धशतकी खेळी केली.
दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये चरिथ असलंका, कुसल परेरा आणि शेवटी भानुका राजपक्षेच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे लंकेने ऑस्ट्रेलियाला 155 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वॉर्नर आणि फिंच यांनी 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर स्मिथ आणि मार्कस स्टॉइनिसने 17व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. फिरकीपटू अॅडम झम्पा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी 70 धावांची आक्रमक सलामी दिली. फिरकीपटू हसरंगाने सातव्या षटकात फिंचा बाद करीत लंकेला पहिले यश मिळवून दिले. फिंचने पाच चौकार आणि दोन षटकारांसह 37 धावा केल्या. त्यानंतर लंकेला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात दुसरे यश मिळाले. दुसरीकडे वॉर्नरने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने 10 चौकारांसह 65 धावा केल्या. दासुन शनाकाने त्याला तंबूत पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने (28) स्टॉइनिसला सोबत घेत संघाचा विजय साकारला
तत्पूर्वी, श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी डावाची सुरुवात केली, पण निसांकाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्यानंतर चरिथ असलंका आणि परेराने आक्रमक खेळीचा नजराणा पेश करीत जुन्या लंका संघाची आठवण करून दिली. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या मार्याला निष्प्रभ करीत अर्धशतकी भागीदारी केली. फिरकीपटू अॅडम झम्पाने असलंकाला बाद केले.