मुंबई ः प्रतिनिधी
आताचे गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) गडचिरोलीत केवळ पुष्पचक्र वाहायला जातात, या शरद पवार यांच्या टीकेला भाजपनेही सडेतोड उत्तर दिले आहे. गडचिरोलीत सर्वाधिक 10 वेळा जाणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपने केला. पवारांनी या वेळी दुष्काळावरून टीका करताना भाजप संवेदनशील नसल्याचेही म्हटले होते. या वक्तव्याचाही भाजपने ट्विटरवरून खरपूस समाचार घेतला आहे.
गडचिरोलीला सर्वाधिक 10 वेळा भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. आता आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण किती वेळा व कशासाठी गडचिरोलीत गेलात याचीही माहिती महाराष्ट्राला द्याल का, असा सवालही पवार यांना भाजपने केला आहे.
आपण म्हणालात की, मी दुष्काळी भागात दौरा केल्याने सरकार जागे झाले. मग आचारसंहितेपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेली भलीमोठी रक्कम, गावांत टँकर, चारा छावण्या हे सारे कसे झाले? मुख्यमंत्री केवळ शहिदांना अभिवादन करण्यासाठी गडचिरोलीला जातात, असे तुम्ही म्हणालात, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. दुष्काळ, नक्षली हल्ले यांसारख्या संवेदनशील प्रश्नांवर तुम्ही राजकारण करताहेत व हे पाहिल्यावर ‘जनाची नाही तर मनाची’ असे आम्हालाही म्हणावेसे वाटते, अशी टीकाही भाजपने केली. राजकारणापलीकडे जाऊन संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहनही भाजपने पवार यांना केले आहे. भाजपने मुख्यमंत्री गडचिरोलीत कधी व कोणत्या कामासाठी गेले होते याची तारखेसह माहिती शिवाय दुष्काळ निवारणासाठीच्या कामांची माहितीही ट्विट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याचा संदर्भ देत गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरल्याचे वक्तव्य केले होते.