अंबा नदीच्या पाणी पातळीत घट
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत वर्षानुवर्षे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. पालीकरांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. पावसाळा संपल्यावर येथून काही अंतरावर असलेल्या बलाप गावाजवळील अंबा नदीच्या के.टी. बंधार्याचे दरवाजे, फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी अडविले जाते, मात्र कोलाड पाटबंधारे विभागाकडून अजूनही हे दरवाजे, फळ्या न बसविल्याने अंबा नदीचे पाणी घटत चालले असून पालीकरांवर अघोषित पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते. या संदर्भात अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मागील वर्षी देखील याच महिन्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नदीचे पाणी घटल्याने जॅकवेल मधील पाणी खेचणारे तीन मोटार पंपदेखील जळाले होते. परिणामी पालीकरांवर पाणीटंचाईचे अघोषित संकट ओढावले होते. त्यावेळी नदीची पाणी पातळी वाढविण्यासाठी अंबा नदी जवळील पुलाजवळ तात्पुरता बंधारा बांधला होता.
यंदा देखील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर येथील बंधार्याला प्लेट टाकण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
बंधार्याच्या फळ्या बसविण्यासाठी कोलाड पाटबंधारे विभागाकडे ताबडतोब पत्रव्यवहार करणार आहोत. नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही यासाठी सज्ज आहोत.
-दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत
बंधार्याच्या फळ्या वेळीच न लावल्याने अंबा नदीचे पाणी घटत चालले आहे. पाटबंधारे विभागाने वेळच्या वेळी बंधार्याच्या फळ्या काढण्याचे व लावण्याचे काम करणे गरजेचे आहे. नगरपंचायतीने देखील यासाठी पाठपुरावा करायला हवा.
-किशोर खरीवले, उपसरपंच, कुंभारशेत
बलाप येथील बंधार्याचे दरवाजे (फळ्या) लावण्यात येणार आहेत, मात्र या संदर्भात पाली नगरपंचायतीने आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही.
-राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोलाड