Breaking News

कोकणातील दुग्ध व्यवसाय दुर्लक्षित

कोकणातील पालखर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने चालणारा दूध व्यवसाय आज जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. याला कारणीभूत प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी ठरले आहेत. सध्या कोकणातील बंद पडलेल्या दूध डेर्‍यांचे व्यवसाय पश्चिम महाराष्ट्रामधील दूध उत्पादन करणार्‍या डेअरी व्यावसायिकांनी घेतले असून कोकणातील दूध व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ अली आहे. सध्या व्यावसायिक आणि घरगुतीसाठी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातून येणार्‍या पिशवीबंद दुधालाच पसंती दिली जात आहे. त्यामुळे कोकणातील स्थानिक शासकीय दूध डेअरी आज बंद झाल्या आहेत. या सुरू असत्या तर कोकणातील दूध व्यवसायाला आज मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा, सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, कर्जत, खालापूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी व राजापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, वेंगुर्ला, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, ठाणे या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मागील दहा वर्षात पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय घरोघरी चालत असे. खेडोपाड्यातील गावांमधून दूध एकत्र करण्याचे काम सहकारी संस्थांच्या माध्यमातून चालत असे कोकणातील अनेक तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण, पर्यटनस्थळे, हॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट यामुळे दुधाची वाढती मागणी बघता व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील येणारे दूध गिर्‍हाईक व दूध व्यावसायिकांनादेखील विक्री करणे परवडत असे. दहा वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर रायगड जिल्ह्यात 176 दुग्धविकास सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यातील अलिबाग तालुक्यात सहा, पेणमध्ये आठ, पनवेलमध्ये 17, उरणमध्ये चार, कर्जतमध्ये 14, खालापूर सहा, सुधागड 26, रोहा सात, माणगाव आठ, म्हसळा एक, महाड 21, पोलादपूर सात, अशा 125 संस्था कार्यरत होत्या. त्यातील 51 संस्था कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या काळातच बंद पडल्या आहेत. इतर सुरू असलेल्या संस्था आज आजारी आहेत. कोकणात पूर्वी कुणबी व यदुवंशी गवळी समाजातील घरांमध्ये गाई, म्हशींचे गोठे होते. मुळात शेती करणार्‍या समाजात प्रत्येक घरात दोन-चार गाई बैल म्हशी पाळलेल्या असतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी महिला किंवा पुरुष मंडळी घरातील आवश्यक असणारे दूध ठेवून उरलेले दूध विक्रीसाठी नेत असत ही मंडळी वाडी वाडी मधून तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर दूध विक्रीसाठी नेत असत. व्यायलेल्या गाई म्हशींच्या सुरुवातीच्या दुधाचा चीक खरवस बनवण्यासाठी देखील शहराकडे मोठ्या प्रमाणात विक्रीला जात असल्याने त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर दूध व्यवसाईक आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता, परंतु कालांतराने वाढती महागाई तसेच या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. जनावरांसाठी कोकणात जुलै ते नोव्हेंबरपर्यंत मुबलक चारा उपलब्ध असतो. त्यानंतर संपूर्ण मदार ही भाताच्या पेंढ्यावर असते, मात्र पेंढा हे पौष्टिक अन्न नाही, तसेच या काळात पेंढा 300 रुपये शेकडा या दराने मिळतो. कोकणातील भातशेतीचे प्रमाण कमी झाल्याने या पेंढ्याचाही तुटवडा पडतो. सिंचनाची कोणतीच साधने नसल्याने डिसेंबर ते जूनदरम्यान जनावरांना हिरवा व पौष्टिक चारा मिळत नाही पर्यायाने या काळात दुधाचे प्रमाण घटते. त्यामुळे तालुक्यातील गोधन कमी होऊ लागले आहे. शेतीची कामे यांत्रिकी पद्धतीने होत असल्याने बैल बाळगने आता शेतकर्‍यांना परवडत नाही. केवळ हौशी शेतकरी शर्यती पुरती बैलजोडी बाळगतात. मुळातच शेतीला पुरक असणारा दुग्धव्यवसाय शेती नसल्याने ओस पडला आहे. जनावरांच्या उपचारासाठी चांगले शासकीय दवाखाने नाहीत. पाळीव जनावरांसाठी लागणारा खर्च त्यांना लागणारी पेंड, औषध उपचाराचा खर्च हा सर्व भार शेतकर्‍यांना परवडण्यास असमर्थ ठरल्याने कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दुग्ध व्यवसायाची जागा आता खासगी संस्थांनी घेतली असून त्यांच्याकडून विकले जाणारे दूध हे स्थानिक दूध विक्रीपेक्षा कमी दराने मिळू लागले, याचादेखील मोठा फटका कोकणातील दूध व्यावसायिकांना बसला. महाड तालुक्यात एकेकाळी शासनाची मोठी दूध डेअरी होती. या शासकीय डेअरीत रोज लाखो लिटर दूध संकलन होऊन, त्यावर प्रक्रिया करून हेच दूध बाटलीबंद करून महाड व इतर शहरात वितरीत केले जात होते, मात्र गेल्या तीन दशकांपासून ही डेअरी बंद पडली असून या जागेवर आता महाडचे भव्य प्रशासकीय भवन होत आहे. आजच्या परिस्थितीत कोकणातील अनेक शेतकर्‍यांकडे गाई आणि म्हशी आहेत, परंतु वाढत्या महागाईमुळे गुरांचे पालन पोषण करणे न परवडण्यासारखे झाले आहे. दुधाच्या किंमती कमी आणि खर्च जास्त. आज या कोकणात शासकीय संस्था सुरू असत्या तर निदान शासनाच्या निश्चित दराप्रमाणे शेतकर्‍याला दूध विकता आले असते, मात्र आज येथील प्रस्थापित पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच कोकणातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.

-महेश शिंदे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply