नवी मुंबई : प्रतिनिधी
देशातील आर्थिक दुर्बल घटक ते सबल घटकांची नोंद उपलब्ध व्हावी त्याद्वारे देशाचे धोरण व योजना कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य होईल त्यासाठी राष्ट्रीय डेटा संकलनाचे काम सुरू असून नागरिकांनी सर्वेक्षण प्रगणक आणि पर्यवेक्षी अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, उपमहानिर्देशक सुप्रिया रॉय यांनी बेलापूर येथे बोलताना केले.
सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने देशभरात समाजर्थिक सर्वेक्षण अंतर्गत पारिवारिक उपभोग व्यय सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत पारिवारिक डेटा संकलनाचे काम 22 जुलै 2022 पासून जून 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांकडून पारिवारिक सर्वेक्षण घेण्यात येणार आहे. नागरिकांनी ही माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि सर्वेक्षण प्रगणक यांना सहकार्य सहकार्य करावे आपली माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे सहाय्यक निर्देशक एस. जी. देवळीकर यांनी सांगितले.
या वेळी उपमहानिर्देशक ओ. पी. घोष यांनी सांगितले की, राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय देशव्यापी नमुना सर्वेक्षणातून केंद्र व राज्य शासनाला योजना व धोरण निर्मितीसाठी साहाय्य होणार्या विविध सामाजिक व आर्थिक माहितीचे संकलन करते.
परिषद यशस्वी करण्यासाठी प्रभारी अधिकारी गोपाळ सिंग, प्रभारी अधिकारी अशोक कुमार, प्रभारी अधिकारी एच व्ही रबाडीया आदी सहकार्य करीत आहेत. क्षेत्रीय कार्यालय, मुंबईतर्फे नवी मुंबईतील सिबीडी येथील सिजिओ कॉम्प्लेक्समध्ये 20 ते 22 जुलै असे तीन दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण परिषद झाली. यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघरमधील क्षेत्रीय सर्वेक्षण प्रगणक अधिकारी मिळून सुमारे 85 मान्यवर सहभागी झाले. सांख्यिकीक डेटा सर्वेक्षण करण्यात सुलभता यावी, सर्वेक्षण कार्यप्रणालीत एकसमानता असावी, सर्वेक्षणदरम्यान येणार्या अडचणी आदींवर सखोल चर्चा परिषदेत करण्यात आले.