केपटाऊनमध्ये गुरुवारी झालेल्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट सामन्याचे धड ना कुणाला विश्लेषण करता आले, ना कुणाला अभिजात क्रिकेटचा आस्वाद घेता आला. पाच दिवसांची ही कसोटी लढत अवघ्या 642 चेंडूंमध्ये संपली. हा खेळपट्टीचा दोष मानायचा की खेळाडूंच्या बदलत चाललेल्या मानसिकतेचा याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.
कुणी म्हणेल वर्षभर क्रिकेटचा बँडबाजा देशभर वाजत असतो, त्यात एका क्रिकेट सामन्याचे एवढे कौतुक कशासाठी? परंतु प्रश्न केवळ कसोटी क्रिकेटचा नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये होणार्या अभिजाततेच्या पिछेहाटीचा हा मुद्दा आहे. तीन मिनिटांच्या फिल्मी संगीताने बैठकीच्या ख्याल गायकीला पाहता पाहता मागे ढकलले. बुद्धिबळासारख्या खेळातही झटपट लढती लोकप्रिय होऊ लागल्या. चित्रकला किंवा शिल्पकलेबाबतही असेच म्हणता येईल. एकूणच अभिजात कला वेळखाऊ आणि कंटाळवाण्या वाटू लागल्या आहेत की काय अशी शंका येते. मनोरंजन वाहिनीवरील तीन महिन्यांच्या महापर्वात महागायक किंवा महागुरू निर्माण होतात. त्यांचे वारेमाप कौतुक होते आणि त्यांना अफाट लोकप्रियताही लाभते. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पूर्वीच्या काळी तीस-तीस वर्षे साधना केल्यानंतर गुरूची शिष्याला मैफलीसाठी परवानगी मिळत असे, परंतु आता एवढा वेळ कोणाकडे आहे? क्रिकेटच्या क्षेत्रातही नेमके हेच घडले. वास्तविक पाच दिवसांचा कसोटी सामना ही एकेकाळी क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असायची. पाच दिवस चालणार्या लढतीमध्ये प्रत्येकी दोन डाव खेळल्यानंतर खर्या अर्थाने क्रिकेटचे रंग दिसू लागतात. या खेळामध्ये क्रिकेटपटूंची ‘कसोटी’ लागते म्हणून तर तिला कसोटी क्रिकेट म्हणायचे, परंतु आता मात्र जमाना बदलला आहे. कसोटी क्रिकेटचा सामना किती दिवसांचा असतो या प्रश्नाचे उत्तर कुणी दीड दिवस असे दिले तर ते आता चूक ठरवता येणार नाही. मर्यादित षटकांचा सामना दोन्ही डाव मिळून कमीत कमी सहाशे चेंडूंचा असतो, पण केपटाऊनमधील कसोटी सामना अवघ्या 642 चेंडूंत आटोपला. कसोटी क्रिकेटकडे हल्ली कोणीही गांभीर्याने पाहात नाही हे मुळचे दुखणे आहे. टी20 लढती किंवा 50 षटकांच्या एक दिवसीय सामन्यांमध्ये प्रचंड पैसा ओतला गेला आहे. झटपट क्रिकेटला जसजशी लोकप्रियता मिळत गेली तसतशी कसोटी क्रिकेटची मातब्बरी उरली नाही. प्रेक्षकांनाही रटाळ फलंदाजीत रस उरलेला नाही हे खरे आहे. त्याबरोबरच दिवसभर खेळपट्टीवर ठाण मांडून फलंदाजी करण्याची क्षमताही खेळाडू हरवून बसले आहेत हेही आहेच. हे सारेच कसोटी क्रिकेटला अत्यंत मारक आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोनच कसोटी सामने खेळले गेले. त्यातील पहिली कसोटी साडेतीन दिवसांत संपली, तर दुसरा कसोटी सामना दीड दिवसांत आटोपला. कसोटी क्रिकेटचे सामने असे भराभर आटोपू लागले तर सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी कोट्यवधींच्या रकमेचा भरणा कुठलीही कंपनी करणार नाही. साहजिकच क्रिकेट नियामक मंडळाचे आणि खेळाडूंचे आर्थिक नुकसान होत राहील. कसोटी क्रिकेटला नवी ऊर्जा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली आहे. अशा प्रकारचे सामने खेळले गेले तर ती लवकरच बंद पडेल हे उघड आहे. तथापि असे असूनही कसोटी क्रिकेटला ना मंडळाचे पाठबळ मिळते, ना क्रिकेट रसिकांचे. त्यामुळेच क्रिकेटपटूंनाही कसोटी क्रिकेटची पर्वा उरलेली नाही हे कटु सत्य स्वीकारावे लागते.