Breaking News

कोकणात 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय -मुख्यमंत्री

शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी
कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणार्‍यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.5) केली.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्र व राज्य सरकार लोकाभिमुख प्रशासन चालवत आहे. रायगड या महापुरुषांच्या पावन व क्रांतिभूमीत 26 लाख लाभार्थींना 1700 कोटी लाभ, तर राज्यात दोन कोटी एक लाख 91 हजार 803 लाभार्थींना शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लाभ मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेनेचे कोकण सचिव विकास गोगावले, कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी काळे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या लाभार्थ्यांना संबंधित लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्तांना घराच्या चाव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले तसेच पनवेल महापालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तातरण प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, रायगड हे मुंबईच्या जवळ असल्याने इथे विविध उद्योग नजीकच्या काळात येणार आहेत. त्यामुळे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात येऊन इथली अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. कोकण किनारपट्टीचे समुद्रकिनारे आणि इथला निसर्ग यामुळे पर्यटन क्षेत्रात भरीव वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईवर अवलंबून असणारा रायगड व कोकणातील बांधव पुन्हा आपल्या गावाकडे परतणार आहे. डबल इंजिन युतीचे सरकार गतिमान असून महापुरुषांच्या क्रांतिभूमीत रायगड हे औद्योगिकरणातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे राज्यात डबल इंजिन सरकार काम करीत आहे. ते वेगवान आहे, असे सांगून कोट्यवधी नागरिकांचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिर असून ते पंतप्रधान मोदींनी बांधून पूर्ण केले याचा आम्हाला अभिमान आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम तसेच झपाट्याने वाढत असलेल्या औद्योगिकरणामुळे यापुढे मुंबईच्या जवळ असणारा रायगड जिल्हा विकासाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे रायगडचे चित्र बदललेले असेल. या कार्यक्रमात 60 टक्के महिला उपस्थित राहिल्या त्यांचे विशेष कौतुक करीत मोदी सरकार महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत आहे. त्यामुळे महिलाच महाराष्ट्राला सक्षम करतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, रायगडात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत असून रोजगाराच्या अनेक संधी इथे उपलब्ध होणार आहेत. मच्छी व्यवसाय, पर्यटन आणि इथल्या फळांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे इथे आर्थिक व्यवस्था बळकट होत असताना कोणी विरोध करण्याचे कारण नाही. हे सरकार उत्तरदायित्व असणारे असल्याने शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे. इथल्या जमिनी शेतकर्‍यांनी विकू नये.
स्वागतपर भाषणात पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, इर्शाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन तीन महिन्यांत करू शकलो ही गतिमानता शासनाची आहे. अतिशय गतिमान पद्धतीने शासन काम करीत आहे. जनतेला असाच दिलासा दिला जाईल.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply