कर्जत ः बातमीदार
नेरळजवळ धामोते-बोपेले हद्दीत हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक भवन असून या सभागृहाचे पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी आणि बांधकाम केलेल्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने 35 लाखांचा निधी दिला आहे. 35 लाख रुपये खर्चाच्या कामाचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास संकुल प्राधिकरणाने दिले आहेत.
कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे हुतात्मे हिराजी गोमाजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिश पोलिसांविरुद्ध लढताना वीरमरण आले.त्यांच्या नावे मानिवली गावात राज्य शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे, तर कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने नेरळ रेल्वे स्टेशनपासून 600 मीटरच्या अंतरावर धामोते-बोपेले गावाच्या हद्दीत सामाजिक भवन बांधण्यात आले आहे. त्या सामाजिक भवनात तळमजल्यावर सभागृह असून सर्व जातीधर्मातील लोकांचे आनंद सोहळे तेथे साजरे होतात. मागील काही वर्षांत झपाट्याने लोकसंख्या वाढत असून त्या सभागृहात जागा अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन कर्जत तालुका आगरी समाज संघटना त्या ठिकाणी पहिल्या मजल्याचे बांधकाम व्हावे यासाठी निधी संकलन करीत आहे. संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील सभागृहाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करीत होते. डिसेंबर 2019मध्ये रायगड जिल्हा परिषदेने पहिल्या मजल्याचे बांधकाम आणि सुशोभीकरण करणे या कामांसाठी निधी वर्ग करण्यात आला होता. नेरळ ममदापूर विकास संकुल प्राधिकरणाकडून 35 लाखांच्या निधीमधून दोन कामे प्रस्तावित करण्यात आली होती.त्या कामांची अंदाजपत्रके, ऑनलाइन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही कामांचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेने 28 एप्रिल रोजी दिले आहेत. ही दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी कामाची निविदा भरणारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता जयेश कालेकर यांना सहा महिन्यांचा अवधी आहे. पावसाळ्यानंतर हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह हे दुमजली आणि टुमदार होणार आहे. निधी दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी आभार मानले आहेत.