Breaking News

नोकरी

मी   मूळचा नाशिक  जिल्ह्यातील  एअर इंडियात भरती निघाली म्हणून माझ्या मामांनी  मला मुंबईला बोलावून घेतले. मी अर्ज  केला मला मुलाखतीला बोलवण्यात आले. मामा मुंबईत राहत होते त्या भागातील काही तरुण मुलांनी मला तुला उद्या मुलाखतीला जायचे आहे ना आम्ही घेऊन जाऊ असे सांगून मला दादरला आणले एका प्रसिध्द हॉटेलात घेऊन गेले . वडा खाऊन सगळे निघून गेले. माझ्या जवळ पैसे नसल्याने हॉटेल मालकांनी मला भांडी घासायला सांगितले . मी दिवसभर भांडी घासली. संध्याकाळी मालकांनी माझी चौकशी केली. मी उद्या एयर इंडियात मुलाखतीला जायचे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी मला मुलाखतीचे पत्र दाखवायला सांगितले. पत्र दाखवल्यावर त्यांनी त्यांच्या नातेवाईकला फोन केला. ते त्याठिकाणी आल्यावर त्यांना काही तरी सांगितले. दुसर्या दिवशी मी मुलाखतीला गेलो तर तीच व्यक्ति मुलाखत घेत होती मला त्यांनी कधी पासून हजर होतोस असे विचारले मी लगेच होतो बोललो आणि सेकंड शिपला मी कामावर हजर झालो.

मी अलिबाग जवळच्या सासवणेला डी,एड. कॉलेजला  भरतीसाठी  खांदेशातून आलो होतो. माझा नंबर लागला नाही. घरी जाण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने अलिबाग मधील एका हॉटेलात कामाला राहायलो. त्याठिकाणी काम करीत असताना चहा घेऊन पापाशेठच्या कार्यालयात जायचो. एकदा त्यांनी माझी चौकशी केली तुझे गाव कोणते , किती शिकला आहेस. मी त्यांना माझी माहिती सांगितल्यावर त्यांनी लगेच एका मित्राला सांगितले हा शिकला आहे याला कोठे तरी नोकरीला लाव. दुसर्या दिवशी मला एम्प्लॉयमेंटच्या कार्यालयात नेले तेथील अधिकार्यांला सांगून पेण आय.टी.आय.ला हमाल म्हणून नेमणूक पत्र घेतले. मला स्व:त पेणला घेऊन गेले. माझी जेवणाची आणि राहण्याची सोय केली.मी काही दिवस तिथे काम केले मग कुलाबा जिल्हा परिषदेत शिक्षकाच्या जागा निघाल्या तिथे अर्ज केला. माझी निवड झाली  आणि शिक्षक म्हणून महाड तालुक्यात नेमणूक झाली. नवीन पनवेल मधील ज्येष्ठ  नागरिक कट्ट्यावर दोन ज्येष्ठ आपण नोकरीला कसे लागलो याचे अनुभव सांगत होते. त्यांचे अनुभव ऐकून नक्कीच असे वाटते की 70 च्या दशकात नोकरी मिळणे किती सोपे होते. 

आज मुलांना शाळेत प्रवेश घेतानाच पालकांची धावपळ सुरू होते. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश त्यासाठी ओळख , डोनेशन, या सगळ्या दिव्यातून बाहेर पडून डिग्री हातात मिळाली की नोकरीसाठी धडपड. दरवर्षी विद्यापीठ नामक कारखान्यातून  लाखो पदवीधर आणि तंत्रज्ञ बाहेर पडतात. पण आजच्या कॉम्प्युटर युगात मनुष्यबळ कमी लागत असल्याने  बेकारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकांची आपल्या पाल्याला नोकरी लावण्यासाठी वेळ प्रसंगी मध्यस्थाला लाखो रुपये देण्याची तयारी असते. नवी मुंबईत नोकरी मिळवून देण्यासाठी लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या बातम्या हल्ली रोजच आपल्याला वाचायला मिळतात. चांगल्या कंपनीत नोकरी लावतो पासून ते सरकारी खात्यात नोकरी लावण्यापर्यंत अशा गुन्हेगार व्यक्ती मदत करीत असतात. त्यामध्ये अनेक अधिकारी ही सामील असतात. पैसे देऊन काही वेळा नोकरी मिळते ही  पण अनेक वेळा पैसे देऊन फसवणूक होते. पैसे देऊन नोकरी मिळत नाही. नोकरी मिळेल या आशेने पालकांनी कर्ज काढून आणलेले पैसे बुडल्याने त्यांना कर्ज बाजारी व्हावे लागते. त्यावेळी पूर्वीचे बरे होते असे आपण सहज म्हणतो. 

आज नोकरीसाठी फसवणूकीच्या गुन्ह्यात झालेली वाढ निश्चितच चिंताजनक आहे. पण याला जवाबदार कोण? मला आठवत माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक जण ओळखीच्या एका कंपनीत नोकरीला लावा सांगायला आला होता . त्याला विचारले तुझे शिक्षण किती दुसर्या प्रयत्नात 10 वी पास आणि टायपिंग केले आहे. पगारची अपेक्षा ही मोठी होती. त्याला सांगितले या पेक्षा कमी पगारात पदवीधर मुली कंपनीत काम करीत आहेत. तुला एवढा पगार वर्कर मध्ये काम केलेस तर मिळू शकतो. त्याचे म्हणणे मग माझे टायपिंग फुकट जाईल. दूसर्या एकाची अपेक्षा संध्याकाळी 5 वाजता घरी पाहिजे कारण संध्याकाळी फिरायला मिळाले पाहिजे. एका मुलाला चांगली नोकरी मिळाली , पगार चांगला होता सगळे त्याच्या मनासारखे होते पण नोकरीचे ठिकाण घरापासून लांब होते. मग घरची आठवण येते म्हणून त्याने त्या भागात चोर्या होतात असे कारण सांगून नोकरी सोडून दिली. आजच्या मुलांच्या या अटी ऐकून खरेच नवल वाटते. अशा प्रसंगी पालक ही मुलांना पाठीशी घालतात. त्यांच्या नोकरीसाठी पैसा खर्च करायला तयार होतात त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावले आहे. त्याचा परिणाम अशा गुन्ह्यांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.

-नितीन देशमुख

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply