Breaking News

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्‍या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने ही मंजुरी दिली आहे. मुंबई उपनगरी रेल्वेवरील वाढती वाहतूक व प्रवाशांची गर्दी पाहता हा ताण कमी करण्याकरिता, तसेच प्रवशांच्या सुरक्षेकरिता मुंबई शहरी प्रकल्प टप्पा-3 तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वेला वातानुकूलित डबे जोडण्यात येणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत रेल्वेला स्वचलीत दरवाजे बसविण्यात येणार आहेत. लांब अंतराचा प्रवास करणार्‍या उपनगरीय प्रवशांच्या सोयीसाठी कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकांवर प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी होणारी गर्दी दूर करण्यासह प्रवाशांची सुरक्षा व स्थानकावर आवश्यक सुविधाही या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेची सुरक्षितता, क्षमतावृद्धी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी दळणवळणावर आधारित रेल्वे नियंत्रण प्रणालीची नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या परिचलनापासून उपनगरीय रेल्वेच्या परिचलन स्वतंत्र ठेवण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईचा प्राण असून, दररोज तीन हजारांहून अधिक रेल्वे गाड्यांमधून 8 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. क्षमतेपेक्षा चौपट प्रवासी ताण या रेल्वेमार्गावर होत असतो. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील 385 किमीवर मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे आहे. मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर दोन, पश्चिम रेल्वेमार्गावर दोन आणि हार्बर मार्गावर एक असे एकूण पाच कॉरिडॉर आहेत. हे सर्व चित्र पाहता प्रवशांना उत्तम सुविधा व सुरक्षा पोहचविण्यासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ महत्त्वपूर्ण ठरणार असून, मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा मजबूत होणार आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply