Breaking News

पाच दिवसांची कसोेटी

पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी आस्थापनांमधील खर्च कमी होईल. तसेच कामाचे तास वाढतील व त्यातून कार्यसंस्कृती मूळ धरेल अशी अपेक्षा सरकारातील काही नेतेमंडळींना वाटते. परंतु पाच दिवसांचा आठवडा करणे ही तात्पुरती मलमपट्टी ठरण्याची शक्यताच अधिक आहे. एका अर्थी सरकारी कर्मचार्‍यांचीही यातून कसोटीच लागणार आहे. केंद्रातील कर्मचार्‍यांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कार्यालयांनाही पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयामुळे 29 फेब्रुवारीपासून दर शनिवार-रविवारी राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना सुटी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी खूष झालेच आहेत, त्याचबरोबर अखेर एकदाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे कूर्मगती सरकार निर्णय घेऊ लागल्याचा आनंद राज्यभरातील जनतेलाही झाला असावा असे म्हणायला हरकत नाही. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी तशी राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांकडून वर्षानुवर्षे केली जात होती. परंतु ती मान्य होण्यास विलंब लागण्यामागे एकंदर प्रशासकीय यंत्रणेचा वेग मंदावू नये हा हेतूच असावा. पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय जाहीर होताच समाज माध्यमांवर एक संदेश फिरू लागला, ज्यात या निर्णयाबद्दल जनतेचेच अभिनंदन करण्यात आले होते. आपली कामे करून घेण्यासाठी आता मंत्रालयात आठवड्यातून सहा ऐवजी पाचच दिवस खेटे घालावे लागतील अशी कोपरखळी या संदेशात होती. सरकारी यंत्रणेच्या कार्यसंस्कृतीचा लौकिक हा असा आहे. त्यामुळेच संबंधित निर्णय हा कर्मचार्‍यांना खूश करणारा असला तरी आजवरच्या सरकारांनी तो घेण्याची घाई केली नव्हती. यंत्रणेचा कामकाजाचा वेग कमी न होऊ देण्याची पुरेशी खबरदारीची उपाययोजना करूनच आघाडी सरकारने हा निर्णय घेतला असावा अशी आशा आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही मराठीतील म्हण सरकारी कचेर्‍यांमधील एकंदरीत सावळ्या गोंधळावर नेमके बोट ठेवणारी आहे. लोकांची सरकार दरबारी असंख्य कामे असतात. ती मार्गी लागणे हे एक मोठे दिव्य असते. सरकारी फाइली विनाविलंब पुढे ढकलण्यासाठी अनेकदा वेगवेगळे उपाय अवलंबले जातात. या कासवगती प्रक्रियेतूनच भ्रष्टाचाराचे पेव फुटते आणि दलालांचा सुळसुळाट होऊ लागतो. अन्यथा,  पाच दिवसांच्या आठवड्याचे तसे जगभरातच स्वागत केले जाते. कर्मचार्‍यांना साप्ताहिक सुटीचे दोन दिवस मिळाल्याने वैयक्तिक आयुष्यातील गरजांसाठी सुट्या घेण्याचे त्यांचे प्रमाण आपसूक खाली येते असे मानलेे जाते. त्यांच्या कौटुंबिक जगण्याचा दर्जा उंचावतो. या सार्‍याचा सकारात्मक प्रभाव त्यांच्या कार्यशैलीवर पडत असल्याचे मानले जाते व त्यातूनच पाच दिवसांच्या आठवड्याचे स्वागत मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांकडून केले जाते. पाच दिवसांच्या आठवड्याचे या खेरीजही काही फायदे सांगितले जातात. रोजच्या रोज कर्मचार्‍यांच्या कामावर जाण्याच्या वेळांना होणारी गर्दी कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे रोजचे कामाचे तास काहिसे वाढतात. यामुळे निरनिराळ्या कार्यालयांतील कामकाजाच्या वेळा थोड्याफार वेगवेगळ्या होत असल्यामुळे एकाच वेळी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर येणारा ताण टाळता येतो. अर्थातच प्रवाशांवरील मानसिक ताण खाली आणण्यास तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासही हातभार लागतो. हे सारे खरे असले तरी, आपल्या देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात युरोपीय पद्धतीची कार्यसंस्कृतीच रुजलेली नाही हे आपले मूळ दुखणे आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply