Breaking News

भारतीय महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल

युवा (19 वर्षांखालील) वन डे विश्वचषकापाठोपाठ महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून पाचव्यांदा हा चषक उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्यांनी इथवर मारलेली मजल दुर्लक्षित करता येणार नाही.

जागतिक महिला दिनी महिलांच्या टी-20 फायनलमध्ये कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमनेसामने होते. ‘कांगारूं’नी यापूर्वी सहापैकी 2010, 2012, 2014, 2018 अशा एकूण चार वेळा या झटपट प्रकारातील विश्वचषकावर नाव कोरले होते. 2009चा पहिला विश्वचषक सोडला तर त्यानंतर प्रत्येक वेळी त्यांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. एकाहून एक सरस खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ बलाढ्य होता. दुसरीकडे मागील विश्वचषकातील कटू आठवणी, वाद विसरून भारतीय संघ नव्या जोमाने पुढे आला होता. नवोदित, वरिष्ठ खेळाडूंचे सुयोग्य संतुलन संघात साधले गेले होते. विशेष म्हणजे याच

स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर ऑसी महिला साखळीतील पराभवाचा हिशेब चुकता करणार? की भारतीय महिला निर्भेळ वर्चस्व गाजवणार, याबाबत सार्‍यांना उत्सुकता होती. अखेर ऑस्ट्रेलियाचा अनुभव सरस ठरला.

महिलांच्या या पराभवाने 2003मधील वन डे विश्वचषक स्पर्धेतील भारतीय पुरुष संघाच्या अंतिम सामन्यातील दारुण पराभवाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या वेळी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने अशाच प्रकारे भारतीय संघावर दणदणीत विजय साकारला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑसी संघाने 359 धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान भारताला पेलवले नाही आणि संपूर्ण संघ 234 धावांत गारद झाला होता. त्याची पुनरावृत्ती महिलांच्या टी-20 विश्वचषकात झाली. अंतिम लढतीत भारतीय खेळाडूंनी दिलेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवित ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी झंझावाती अर्धशतकी खेळी केल्या, ज्यामुळे त्यांच्या संघाने 185 धावांचे तगडे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणात चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचा डाव 99 धावांमध्ये संपुष्टात आला. या स्पर्धेत दबदबा राहिलेल्या फिरकी गोलंदाजांना निर्णायक लढतीत आपली चमक दाखविता आली नाही, तर फलंदाजांनीही पुरती निराशा केली.

गेल्या महिन्यात झालेल्या 19 वर्षांखालील वन डे विश्वचषकातही भारतीय युवा खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करून अंतिम फेरीत धडक दिली होती, मात्र हा अजिंक्य संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला आणि विश्वचषक हातचा निसटला. 2017मध्ये ‘विराट’सेना चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अशीच अनपेक्षितरीत्या पराभूत झाली होती. अंतिम सामन्यात एक चूकही महाग पडते. मुख्य म्हणजे अशा लढतीमध्ये शेवटपर्यंत हार न मानता विजीगिषू वृत्तीने लढायचे असते. त्यासाठी भारताचेच उदाहरण बोलके आहे. 1983च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ साखळी फेरीत दिग्गज वेस्ट इंडिज संघाकडून पराभूत झाला होता. त्यानंतर अंतिम लढतीत हेच दोन संघ समोरासमोर आले. ही लढत जिंकून विंडीज संघ विश्वचषकाची हॅट्ट्रिक साधेल, असे मानले जात होते. त्यातच प्रथम फलंदाजी करताना कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारताचा डाव 183 धावांमध्ये आटोपला होता. आता विंडीज संघ सहज बाजी मारेल असे वाटत होते, पण कपिलदेव व सहकार्‍यांनी आपला खेळ उंचावत विंडीजला 140 धावांमध्ये गुंडाळून इतिहास रचला होता. 

टी-20 विश्वचषकात भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पराभूत झाला असला तरी शेवटचा सामना वगळता या स्पर्धेत भारताने शानदार प्रदर्शन केले. साखळीतील सर्वच्या सर्व म्हणजे चारही सामने भारतीय महिलांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर जिंकले होते. उपांत्य फेरीचा इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. खरंतर हा सामना व्हायला हवा होता. कारण इंग्लंड संघही तुल्यबळ होता. एक थरारक लढत क्रिकेटप्रेमींना पाहावयास मिळाली असती, पण राखीव दिवस नसल्याने इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला, तर साखळीतील गुणांच्या जोरावर भारत अंतिम फेरीत दाखल झाला. 

भारतीय महिलांची एकंदर वाटचाल पाहिली तर त्या नक्कीच प्रगती करीत आहेत. आतापर्यंत भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कधीही पोहचला नव्हता. ती कामगिरी यंदा महिलांनी करून दाखविली. भारतीय पुरुष संघ गुणवत्ता असूनही असाच हेलकावे खात होता. कधी चुकीची संघनिवड, तर कधी प्रशिक्षकासोबतचा वाद याचा परिणाम खेळावर होत होता. अखेर टीम इंडियाने कात टाकली आणि 2007मध्ये पहिलावहिला टी-20 विश्वचषक, तर 2011मध्ये दुसर्‍यांदा वन डे विश्वचषक जिंकून संघाने प्रतिभा सिद्ध केली. आपल्या महिला संघाचे भवितव्यही उज्ज्वल आहे. त्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शनाची गरज आहे. अपयशातून शिकत चुका सुधारून त्यांनी यशाला गवसणी घातल्यास आश्चर्य वाटायला नको!

– समाधान पाटील (9004175065)

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply