अत्यावश्यक सेवांना सूट
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 3) रात्री 9 वाजल्यापासून 14 जुलैच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यासाठी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला यश आल्याने आता या लॉकडाऊनच्या माध्यमातून कोराना विषाणूची साखळी
तोडणे शक्य होईल.
बुधवारी (दि. 1) रात्री महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन घोषित करण्याचा आदेश काढला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. कृषी व अन्न पुरवठा करणारे उद्योग, दूध डेअरी, किराणा दुकाने, दवाखाने, मेडिकल सेवा मात्र सुरू राहणार आहे. तसेच दारूची ऑनलाइन विक्री आणि घरपोच सेवाही सुरू राहणार आहे.
या काळात अत्यावश्यक सेवा आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांसाठी महापालिका हद्दीत लॉकडाऊन असणार आहे. महापालिका हद्दीत येणार्या शहर परिवहन बससेवा, टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रवासी वाहतुकीस मात्र परवानगी आहे, परंतु त्यासाठी चारचाकी वाहनामध्ये चालक आणि दोन प्रवासी, रिक्षात चालक आणि एक प्रवासी, तर दुचाकी वाहनावर केवळ चालवणारी व्यक्ती असे बंधन आहे. अशा वेळी त्या व्यक्तीच्या निवासी पत्त्यापासून दोन किमी परिघातच ही सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यापेक्षा जास्त अंतरावर वाहन घेऊन गेल्यास कारणमिमांसा तपासून संबंधित वाहन जप्तीची किंवा इतर कडक कारवाई करण्यात येईल.
खासगी आस्थापनांकडून सुरू असलेल्या आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे कामकाज बंद असेल, तथापि बाहेरून येणार्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल. ज्या व्यक्तींना घरातच अलगीकरण किंवा विलगीकरण केले असेल त्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल, अन्यथा त्यांच्यावर भा. दं. वि. कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करून महापालिकेने स्थापन केलेल्या वर्गीकरण कक्षात ठेवण्यात येईल. महापालिका हद्दीतील सर्व रहिवासी घरीच राहून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून परवानगी असलेल्या कामासाठीच बाहेर पडतील. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे लग्न समारंभाव्यतिरिक्त कोणताही जमाव कायदेशीर कारवाईस पात्र असेल.
रुग्णालये व वैद्यकीय सेवा पुरवणार्या संस्थांव्यतिरिक्त सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तर दूध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. वैद्यकीय सेवा पुरवणार्या संस्था, रुग्णालये, औषधांची दुकाने व रुग्णवाहिका सेवा 24 तास सुरू राहील. मद्यविक्रीची दुकाने ऑनलाइन पद्धतीने किंवा घरपोच डिलिव्हरी देऊन विक्री करतील. सर्व व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा आणि गोदामे बंद राहतील. यामधून सतत प्रक्रिया करणारे उद्योग, फार्मासिटिकल युनिट्सना परवानगी आहे. पिठाची गिरणी,
खाद्यसंबंधित उद्योग, दुग्धशाळा सुरू राहतील. औद्योगिक वसाहतीत शासनाने परवानगी दिलेले उद्योग सुरू राहतील.
शासकीय-निमशासकीय कार्यालये शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरू राहतील. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक एटीएम, टेलिकॉम, इंटरनेट व डाटा सर्व्हिस, रुग्णालय व वैद्यकीय उपचार केंद्र कर्मचारी, पेट्रोल व गॅस कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी, पत्रकार आणि महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचार्यांना त्यांचे ओळखपत्र हाच पास असेल, वेगळ्या ओळखपत्राची आवश्यकता नाही. इतर व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी महापालिका प्रभाग अधिकारी किंवा पोलीस तात्पुरता पास देऊ शकतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणार्या आस्थापना व दुकानांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.
ठाकूर बंधूंच्या मागणीला यश
पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली होती व त्या संदर्भातील निवेदनही दिले होते. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या दर दिवसागणिक 100ने वाढायला सुरुवात झाल्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. प्रशासक म्हणून या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक पावले उचलणे काळाची गरज आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कडकपणे लॉकडाऊन अमलात आणण्याची गरज असून हे लॉकडाऊन किमान सात दिवसांचे असावे, अशी मागणी चर्चा करताना केली होती. त्यानुसार आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.
देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात होता. जून महिन्यात लॉकडाऊन उठवायला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र काही नागरिकांचा बेशिस्तपणा वाढला. परिणामी कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे आम्ही आयुक्तांकडे पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, हीच अपेक्षा.
-परेश ठाकूर, महापालिका सभागृह नेते