शत्रू राष्ट्रांची उडणार दाणादाण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लष्कर दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 15) झालेल्या संचलनात लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कशा प्रकारे लक्ष्य करतात हे लष्कराने दाखवून दिले.
अनेक ड्रोन एकत्र मिळून एका मोहिमेला तडीस नेतात. या सिस्टीमला ड्रोन स्वॉर्मिंग असे म्हणतात. हे नवे तंत्रज्ञान भविष्यात युद्धाचे संपूर्ण चित्र बदलू शकते. नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हणजेच कुठल्याही कॉन्टॅक्टविना होणार्या युद्धात हे हत्यार अत्यंत प्रभावी ठरेल.
लष्कर दिनी झालेल्या संचलनावेळी अनेक ड्रोननी मिळून शत्रूचे टँक, दहशतवाद्यांचे तळ, हेलिपॅड, फ्यूल स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यामध्ये एकूण 75 ड्रोन सहभागी झाले होते. यामध्ये दाखवण्यात आले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ड्रोन कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशातील 50 किमी आतपर्यंत गेले आणि लक्ष्य ओळखून ते उद्ध्वस्त केले. या सिस्टीममध्ये सर्व ड्रोन एकमेकांशी संपर्क साधत एकत्र मिळून मोहीम पूर्ण करतात. भारतीय लष्कराने स्वदेशी कंपन्यांसोबत मिळून ड्रोन स्वॉर्मिंग प्रणालीचे प्रदर्शन केले. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल्या पावलाचे प्रतीक आहे, तसेच भविष्यात युद्ध कशा प्रकारे लढले जाईल याची झलक या माध्यमातून दाखवण्यात आली. आता अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे जगभरातील युद्धाची पद्धत बदलत आहे.