म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यात गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण आहे. गुरूवारी (दि. 5) पहाटे तालुक्यात काही ठिकाणी अवेळी पावसाचा शिडकाव झाला आहे. यामुळे आंबा व काजू बागायतदार हैराण झाले आहेत. बदललेले वातावरण आणि पावसाचा शिडकाव यामुळे आंबा व काजू पिकांच्या मोहराचे पर्यायाने पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आंबा व काजू पिकासाठी आवश्यक असलेले थंडीचे वातावरण नोव्हेंबर अखेरपासून निर्माण झाले होते. यावर्षी आंबा, काजू चांगले मोहरणार असे वातावरण असताना अचानक वातावरणात रात्री थंड, दिवसभर ढगाळ व मळभट वातावरण यामुळे मोहोर येण्यास व आलेला मोहोर सदृढ वाढण्यास अडसर होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे तर अवेळी पावसाने शिडकाव केला आणि बागायतदारांच्या चेहर्यावर चिंतेच्या छटा दिसू लागल्या.निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात कशी करायची, आंबा व काजू पिकांचे सरंक्षण कसे करायचे? या विवंचनेत असलेल्या बागायतदारांना कृषी खात्यामार्फत दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. म्हसळा तालुक्यात आंबा पिकाखाली 1879 हेक्टर व काजू पिकाखाली 769 क्षेत्र आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा आंबा व काजू पिकावर फारसा परिणाम होणार नाही, असे विश्वासाने सांगितले जाते.
पालवीचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी लॉम्बाडा सॉलेथ्रीन 5 टक्के प्रवाही किंवा क्वीनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
-डी. डी. अनाप,
तालुका कृषी अधिकारी, म्हसळा