Breaking News

सारे वाद श्रीरामार्पण

काळाचा महिमा अगाध म्हटला पाहिजे. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, दंगली, आंदोलने, अटकसत्रे, हिंसा अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून अयोध्येतील राम मंदिराचा लढा शतकानुशतके लढला गेला. यातील नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जथ्यात ‘अनेकांमधील एक’ बनून वावरणारा सामान्य कार्यकर्ता 30 वर्षांनंतर याच राम मंदिराच्या पायाभरणीची शिळा ठेवेल असे त्यावेळी कुणाला स्वप्नात तरी वाटले असेल का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजून 15 सेकंदांनी अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या पायातील पहिली वीट रचली, त्या क्षणाला भारताच्या इतिहासाने कलाटणी घेतली. एका नव्या युगाचा हा प्रारंभ मानावा लागेल. तब्बल 492 वर्षे सुरू राहिलेला श्रीराम मंदिराचा लढा त्या क्षणी खर्‍या अर्थाने संपुष्टात आला. संपूर्ण भारतभर कोट्यवधी लोकांनी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा सोहळा तृप्त मनाने आणि डोळ्यांनी पाहिला. यामध्ये संघ परिवाराशी निगडित असलेल्या रामभक्तांचा समावेश होता, तसाच तो अन्य विचारसरणीच्या लोकांनाही प्रभावित करून गेला. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये पार पडलेला हा सोहळा दृष्ट लागण्याजोगा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केलेले समयोचित भाषण त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाची साक्ष देणारे होते. गेल्या तीन दशकांमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या वितंडवादाचा त्यांनी उल्लेखदेखील केला नाही. प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी एकात्म भारताचे दर्शन घडवूया, असे आवाहन केले, ते अतिशय मनोज्ञ होते. हा नेत्रदीपक सोहळा अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडला आहे याची सार्‍यांनाच जाणीव आहे. कोरोनाचे संकट नसते तर आज देशभर अक्षरश: दिवाळीसारखे वातावरण असते यात शंका नाही, परंतु सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या निर्बंध-नियमांच्या मर्यादा पाळून अतिशय सौहार्दाने भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.

दशकानुदशके लांगुलचालनाचे राजकारण करणार्‍या काँग्रेसजनांच्या मुखीदेखील यानिमित्ताने अखेर रामनाम यावे हा काळाचा महिमा नव्हे तर आणखी काय? ज्या सत्ताधीशांशी लढताना हजारो कारसेवकांनी बलिदान दिले, राम मंदिरासाठी आपल्या आयुष्याचा होम केला, त्या माजी सत्ताधीशांना आता कुठे श्रीरामाचा महिमा पटू लागला आहे. म्हणूनच प्रियांका गांधी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग अशा काँगेसी नेत्यांनी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचे स्वागत केले. अर्थात ते उचितच झाले. कारण प्रभू रामचंद्र हे काही भारतीयांसाठी फक्त देव नाहीत, तर भारतीय जनमानसासाठी प्रभू रामचंद्र हे एक जीवनमूल्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत एकेकाळी ‘रामराज्य’ होते. रामराज्य म्हणजे असे राज्य जिथे दलित, शोषित, वंचित, पीडित, याचक आणि दाते यांच्यासाठी एकच न्यायव्यवस्था आहे. सर्व प्रजाजन सुखी आणि आनंदी आहेत. जिथे दुष्कृत्याला स्थान नाही. याच ‘रामराज्या’ची अपेक्षा स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी यांनी व्यक्त केली होती. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या भूमिपूजनानंतर भारतीय समाज म्हणून आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे. अयोध्येत वादातीत ठिकाणी भव्य-दिव्य राम मंदिर लवकरच उभे राहील. त्यायोगे अयोध्या आणि शरयू तीराचा परिसर समृद्ध व विकसित होईल, परंतु त्याकडे कुणीही निव्वळ पर्यटन स्थळ म्हणून पाहू नये. आणखी काही काळानंतर असे म्हणता आले पाहिजे की येथूनच रामराज्य सुरू झाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply