एखादा मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या भल्यासाठी पावले उचलत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उद्योजकांना भेटून उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची उद्योगांची पळवापळवी सुरू आहे, अशा शब्दांत सत्ताधारी महाविकास आघाडीने संभावना केली ती सर्वथा अनुचित आहे. आपल्या राज्यात गुंतवणूक वाढावी, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सारेच मुख्यमंत्री परराज्यात जाऊन प्रयत्न करतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील दरवर्षी मुंबईत येऊन गुंतवणुकीची आवाहने करतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना नावे ठेवण्याचे काहीच कारण नाही, परंतु एवढे भान महाविकास आघाडीतील नेत्यांना कसे असणार?
सुमारे 110 वर्षांपूर्वी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. आज आपण जिला बॉलीवूड या संबोधनाने ओळखतो ती ही चंदेरी दुनिया, मायानगरी मुंबई आणि कोल्हापुरात जन्माला आली. तिला एक शतकभराचा देदीप्यमान इतिहास आहे. मुंबईतील चित्रपटसृष्टी उत्तरेत नेण्यासाठी उत्तर प्रदेशचे कर्तबगार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हालचाली सुरू केल्याने सत्ताधारी शिवसेनेची तडफड होताना दिसत आहे. बॉलीवूडचे जितके वय आहे त्याच्या निम्म्यानेही शिवसेनेचे वय नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांना शिवसेनेतर्फे होणारा विरोध अनाकलनीय आहे. सुप्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बॉलीवूडमधील घराणेशाही, अमली पदार्थांचा विळखा, ढिल्या नीतीमत्तेचे किस्से अशा अनेक नकोशा गोष्टी चर्चेत आल्या. सोशल मीडियामध्येदेखील त्यांचा यथेच्छ समाचार घेतला गेला. त्याच सुमारास योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड मुंबईतून उत्तरेत आणण्याबाबत आपला इरादा जाहीर केला. नुसता इरादा व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर नॉयडा येथील यमुना एक्स्प्रेस वेच्या काठाशी एक हजार एकर जमीन प्रस्तावित चित्रपटसृष्टीसाठी मुक्ररदेखील करून टाकली. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर निर्माते, दिग्दर्शकांना भेटण्याचा सपाटा लावला. याच मोहिमेचे पुढील पाऊल म्हणून मुख्यमंत्री आदित्यनाथ मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. येथील नामवंत निर्माते व दिग्दर्शक तसेच अभिनेत्यांशी चर्चा करूनच ते परतणार आहेत. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेते रणदीप हुडा, अनुपम खेर यांच्या खेरीज अनेक मोठ्या चित्रपटनिर्मात्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी ते सल्लामसलत करणार आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा आजवरचा लौकिक पाहता ते हाती घेतलेले काम तडीला नेतील यात शंका नाही, परंतु त्यांच्या या प्रयत्नांकडे शिवसेनेने मात्र अतिशय नकारात्मक रीतीने पाहिले आहे असे वाटते. शिवसेनेला तर मुंबई आणि बॉलीवूड ही आपली जहागिरीच वाटते, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चित्रपटसृष्टीला कुणी एक असा नेता नाही की मायबाप नाही. स्वत:च्याच ऊर्जेवर चालणारी ती एक संकल्पना आहे. अगदीच प्रांजळपणे सांगावयाचे तर बॉलीवूडला मुंबईपासून कधीच वेगळे करता येणार नाही. कारण गेल्या शतकभरातील हजारोंच्या परिश्रमांमुळे आणि काही प्रतिभावंतांच्या आविष्कारांमुळे आज बॉलीवूड नावाची चंदेरी दुनिया मुंबईत सुखाने नांदत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील हीच भावना व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नांमुळे उत्तरेमध्ये चित्रपटनिर्मितीचे आणखी एक केंद्र उभे राहील इतकेच. त्याचे सार्यांनीच स्वागत केले पाहिजे.