पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिरकणी महोत्सवाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 7) करण्यात आले होते. पनवेलकर महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन हा महोत्सव उत्साहात साजरा केला. दरम्यान, या महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले व महिला भगिनींशी संवाद साधला.
हिरकणी महोत्सवात बचत गटांचे स्टॉल्स, आरोग्य शिबिर, स्वरक्षणाचे धडे, सायबर व्याख्यान तसेच खेळ पैठणीचा, गीत, संगीत, गायन, नृत्य, महाराष्ट्राची लोकसंस्कृती असे कार्यक्रम झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल तीन आशा स्वयंसेविकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महापालिकेच्या अग्निशमन दलातील शुभांगी घुले व तेजश्री साळुंखे यांनी घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, येत्या दोन महिन्यात आपल्या परिसरात विमानतळ सुरू झाल्यानंतर पनवेल शहराचे नाव जगाच्या नकाशावर येणार आहे. त्यामुळे विकासकामांच्या बाबतीत महापालिकेला जोमाने काम करावे लागणार आहे. या कामात सर्वांचे योगदान पाहिजे आहे, तर आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित हिरकणी महोत्सवात महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी, त्यांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापुढेही महापालिका महिलांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे.
या महोत्सवास माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, बचत गटांच्या स्टॉल्सला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत पाहणी केली.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …