Breaking News

खास महिला दिनानिमित्तमराठीतील पाच लक्षवेधक अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली इतिहासात अनेक गुणी अष्टपैलू, गुणी अभिनेत्रींचा सहभाग आहे. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटापासून ते रंगीत चित्रपटापर्यंत आणि सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह ते ओटीटी असा हा प्रवास आहे. या वाटचालीतील पाच अभिनेत्री निवडणे तुफान गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये शिरताच विंडो सीट मिळण्यासारखेच अवघड. या निवडीतून मराठी चित्रपटाच्या लक्षवेधक वाटचालीतील काही गोष्टींचा वेध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.
सुलोचनादिदी
’विठू माझा लेकूरवाळा’ या मराठी चित्रपटाच्या सेटवरची ही गोष्ट! चित्रपटातील एका करुण प्रसंगाचे चित्रीकरण सुरू होते, देवाचा कंठा चोरण्याचा आळ जनाबाई (सुलोचनादिदी) यांच्यावर येतो. ती देवाच्या पुढ्यात येऊन चिडून देवाला खूप शिव्या घालते आणि आर्त किंकाळी मारते व तेथेच कोसळते…
कॅमेरा सुरू झाला, दृश्य सुरू झाले, पण सुलोचनादिदींनी या वेळी अशी काही किंकाळी मारली की त्यांचा तो आर्त स्वर सेटवर असलेल्या प्रत्येकाचे काळीज कापीत गेला. दृश्याचे शूटिंग संपले आणि या चित्रपटात नामदेवांची भूमिका साकारणारे अरुण सरनाईक पुढे येत सुलोचनादिदींच्या पायाला स्पर्श केला. सरनाईक यांचे डोळे पाणावले होते. ते दिदींना म्हणाले, बाई, आता जो अभिनय केलात त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत…
सुलोचनादिदींना मिळालेली ही उत्कट दाद होती. ’सुलोचनादिदी’ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा एक चेहरा. रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडूत त्यांनी अभिनय प्रवास केला. वात्सल्यमूर्ती हा एकच शब्द त्यांच्या कार्यकर्तृत्व आणि प्रतिमा यासाठी परफेक्ट ठरतो. सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दीवाण. कोल्हापूरजवळच्या खडकलाट या खेड्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपट पाहण्याची विशेष आवड होती. मा. विनायक यांना एकेकाळी शिकवलेल्या शिक्षकांशी या रंगूच्या वडिलांचा परिचय होता. त्यांच्या ओळखीने रंगूला मा. विनायक यांच्या ’प्रफुल पिक्चर्स’ या कंपनीत प्रवेश मिळाला. मा. विनायक यांनी रंगूला ’चिमुकला संसार’ या चित्रपटात छोटीशी भूमिका दिली. प्रफुल्ल पिक्चर्सचा मुक्काम कोल्हापूरवरून मुंबईला हलला तेव्हा त्या कोल्हापुरातच भालजी पेंढारकर यांच्या प्रभाकर स्टुडिओत दाखल झाल्या. 1946मध्ये प्रभाकर पिक्चर्सच्या ’सासूरवास’ या चित्रपटात भूमिका साकारली, तर ’करीन ती पूर्व’ या नाटकाच्या वेळी भालजीनी त्यांचे नाव ’सुलोचना’ असे केले आणि मग 1947 साली त्या ’जय भवानी’ या चित्रपटात नायिका झाल्या आणि त्यांची अभिनेत्री म्हणून वाटचाल आकार घेऊ लागली. ’वहिनीच्या बांगड्या’ या चित्रपटाच्या यशाने त्याना वहिनी आणि ताई अशी आदरयुक्त प्रतिमा प्राप्त झाली.
‘प्रपंच’मध्ये गावातील एका कुंभारणीच्या भूमिकेसाठी सुलोचनादिदींना निर्मात्याकडून नेसण्यासाठी नवीन साड्या देण्यात आल्या, पण यामुळे ही भूमिका योग्य वठणार नाही असे वाटल्याने त्यांनी त्या साड्या गावातील गरीब बायकांना दिल्या आणि त्यांच्याकडील जुन्या, जीर्ण साड्या घेऊन त्या नेसल्या. यामुळेच आपण या चित्रपटातील व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकू असा त्यांना विश्वास होता आणि झालेही तसेच. सुलोचनादिदींनी हिंदी चित्रपटातही खूप मोठ्या प्रमाणात भूमिका साकारल्या.
चिमणी पाखरं या मराठी चित्रपटाची ’नन्हे मुन्ने’ या नावाने रिमेक निर्माण करण्यात आला. तो सुलोचना यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटात त्यांनी प्रामुख्याने चरित्र भूमिका साकारल्या.
प्रेषक आणि चित्रपट यापासून आपण वेगळे होऊच शकत नाही अशीच त्यांची भावना होती. सिनेमा, आपले गुरू आणि जनता जनार्दन यांनी आपणास मोठे केले, वैभव प्राप्त करुन दिले असे त्या मानत. या प्रवासात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 1999 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवले. महाराष्ट्र शासनाने त्यांना 1972 साली ’जस्टीस ऑफ पीस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1997 साली त्यांना व्ही. शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला असलेले देणे मोठे आहे. त्यांची एकूणच दीर्घकालीन अभिनय वाटचाल पाहता त्यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात यायला हवे होते.
सीमा देव
सीमा देव म्हणजे मराठी चित्रपटातही सोज्वळ, सौम्य (सोबर या अर्थाने) प्रतिमा आणि त्याच इमेजनुसार त्यांना प्रामुख्याने मिळालेल्या भूमिका. त्यांचे मूळ नाव ’नलिनी सराफ’. मुंबईत गिरगावातील बनाम लेन येथील दहा बाय चौदा अशा अगदी छोट्या जागेत तीन बहिणी आणि एका भावासोबत त्या रहात. वडील गोल्डन टोबॅको कंपनीत कामाला होते, पण अचानकपणे वडिलांचे छत्र लहान वयात हरवलेले आणि भावंडांची जबाबदारी अशा वेळी सीमा यांनी घरच्या आर्थिक गरजेतून चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली. तशा त्या शाळेत असताना योगेन्द्र देसाईंच्या बॅले ट्रूपमधून नृत्य करीत असत. त्या एका शोचे त्याना वीस रुपये मिळत. शनिवार रविवारी शो असला की ऐशी रुपये मिळत. पन्नासच्या दशकात ही रक्कम खूपच आनंद देणारी होती. विशेष म्हणजे त्याच बॅले ट्रूपमध्ये त्यांच्याच वयाच्या आशा पारेखही नृत्यांगना होत्या. इब्राहिम नडियादवालांच्या ’अयोध्यापती’ या हिंदी चित्रपटात बालवयीन सीतेच्या भूमिकेसाठी आशा पारेख यांची निवड झाली, त्याच चित्रपटात सीमा यांना बालवयातील उर्मिलेची भूमिका मिळाली. या चित्रपटात उषा किरण कैकयी झाल्या होत्या तर रत्नमाला सुमित्रेच्या भूमिकेत होत्या.
सीमा देव या रमेश देव यांना पहिल्यांदा भेटल्या, हा किस्सा खूप रंजक आहे. गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत जाण्यासाठी त्यांनी आपल्या आईसोबत चर्नी रोड येथे ट्रेन पकडली. पुढच्याच ग्रॅन्ट रोड स्टेशनवर रमेश देव यांनी नेमकी हीच ट्रेन पकडली आणि या दोघींच्या समोर येऊन ते बसले. सीमाताईंच्या आईना रमेश देव अभिनेता म्हणून अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे या दोघींनी त्यांच्याकडे तसे फारसे लक्ष दिले नाही. गोरेगाव स्टेशनवर उतरल्यावर या दोघींना फिल्मीस्तान स्टुडिओत जाण्यासाठीचा रस्ता माहीत नव्हता. म्हणून त्यांनी रमेश देव यांच्या मागे मागे जाणे पसंत केले. फिल्मीस्तानच्या वतीने मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार होती. म्हणून हे सगळे घडत होते. विशेष म्हणजे, सीमा यांना या चित्रपटात भूमिका मिळाली. योगायोग असा की या चित्रपटात ते बहीण भावाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट होता ’आलिया भोगासी’! एका ज्योतिषाकडून सांगितले की, नलिनी यांचे चित्रपटासाठी ’स’ आद्याक्षराने सुरू होणारे नाव ठेवा. ते भाग्यकारक राहिल. त्याच वेळेस गिरगावातील मॅजेस्टीक सिनेमात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात नायिकेचे पडद्यावरचे नाव ’सीमा’ होते. त्यावरून नलिनी यांचे नाव ’सीमा’ असे झाले. दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट ’उसना नवरा’ या नाटकावर आधारित होता. या चित्रपटात जयश्री गडकर आणि राजा गोसावी हे नायक नायिका होते. फिल्मीस्तानच्या पहिलं प्रेम, बोले तैसा न चाले (हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही) या चित्रपटात भूमिका साकारल्यावर त्यांनी फिल्मीस्तान सोडले. त्यानंतर त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. ’राजमान्य राजश्री’ या चित्रपटात त्या सहनायिका म्हणून सर्वप्रथम चमकल्या. राजा परांजपे दिग्दर्शित ’जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली अंध नायिकेची भूमिका रसिकांना खूप आवडली आणि त्या मराठी चित्रपटाच्या यशस्वी नायिका म्हणून गणल्या जाऊ लागल्या. राजा परांजपे यांना त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील गुरू मानतात. राजा ठाकूर आणि मधुकर पाठक या दिग्दर्शकांचाही आपल्यावर प्रभाव आहे असे त्या आवर्जून सांगत.
मराठी चित्रपटात भूमिका साकारत असतानाच त्यांनी हिंदी चित्रपटातही भूमिका साकारल्या. ’भाभी की चुडिया’ या चित्रपटात त्या भूमिका साकारत असताना निर्मात्यांनी त्यांना अगदीच साधी साडी नेसायला दिली असल्याचे चित्रपटाच्या नायिका मीनाकुमारी यांच्या लक्षात येताच त्या सीमा देव यांना आपल्या घरी घेऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या भारी साडीतील साडी नेसायला दिली.
सीमा देव यांचा स्वतःचा अतिशय आवडता चित्रपट होता ’सुवासिनी’. या चित्रपटाची चित्रफित त्यांनी व्यवस्थित जपून ठेवली. कधी जुन्या आठवणीत रमण्यासाठी, तर कधी सहज म्हणूनही त्या हा चित्रपट पाहत. त्यांनी आपल्या अनुभव आणि आठवणींवर लिहिलेले ’सुवासिनी’ हे आत्मचरित्र वाचनीय. पेंटींग आणि लिखाण या त्यांच्या अतिशय आवडत्या गोष्टी आहेत.
सी.पी. दीक्षित दिग्दर्शित ’गजब’मध्ये त्यांनी धर्मेंद्रच्या आईची भूमिका साकारली आणि त्यानंतर त्यांनी टी. रामाराव दिग्दर्शित ’मजबूर’मध्ये सनी देओलची आई साकारलीय. धर्मेंद्र प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा वयाने मोठा, तर सनी देओल साधारण अजिंक्य देवच्या वयाचा, पण दोन्ही भूमिकांना त्यांनी योग्य न्याय दिला. अशा चरित्र भूमिकेत वाटचाल करीत असतानाच ’रूप की रानी चोरो का राजा’ (1993)मध्ये भूमिका साकारल्यावर त्यांना असे वाटले की आता पुरे झाले हे चित्रपटात भूमिका साकारणे. असा निर्णय घ्यायची त्यांच्यावर वेळ का आली? तर या चित्रपटातील त्यांची भूमिका अशा काही विचित्र पद्धतीने कापली गेली होती की त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला काहीच आकार अथवा अर्थ नव्हता. अशा निरर्थक भूमिका साकारत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाला आणि आवडी निवडीला वेळ द्यावा असे वाटले. त्यात त्या छान रमल्या. नातवांसोबत खेळू लागल्या. याच काळात देव कुटुंबिय जुहूच्या मेघदूत या आपल्या निवासस्थानावरून वर्सोवा येथे राह्यला गेले आणि सीमाताई घरची सजावट आणि देवपूजा यात रमल्या. अनेक वर्षानी महेश कोठारे यांनी सीमाताईना ’दुभंग’ या चित्रपटातील मुस्लिम व्यक्तिरेखेबाबत विचारले. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी यापूर्वी कधीच साकारली नव्हती. त्यामुळे त्यांनी या भूमिकेला होकार दिला आणि पुन्हा त्या कॅमेरासमोर आल्या. त्याच वेळेस अमोल शेडगे दिग्दर्शित ’जेता’मध्ये त्यांनी भूमिका साकारत आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली.
जयश्री गडकर
आपल्या कर्तृत्वाने आपली गुणवत्ता सातत्याने अधोरेखित करणं म्हणजे काय असते हे जयश्री गडकर यांच्या कारकिर्दीवर ’फोकस’ टाकताना पटकन लक्षात येते. अभिनय, नृत्य, सौंदर्य आणि मेहनत या गुणांवर जयश्री गडकर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अतिशय मानाचे स्थान प्राप्त केलेल्या अभिनेत्री ठरल्या. बालपणीपासूनच स्वप्न रंगवायला त्यांना विशेष आवडे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कारवार जिल्ह्यातील सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी गावचा त्यांचा जन्म. वयाच्या पाचव्या वर्षी त्या मुंबईत आल्या. गिरगावातील खेतवाडीतील म्युनिसिपल शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर राममोहन हायस्कूलमध्ये त्या दाखल झाल्या. शाळेत असतानाच त्या ललित कलांकडे आकर्षित झाल्या. हळूहळू शाळा, नृत्य आणि गायन क्लास सांभाळून त्या हौशी रंगभूमीवर वावरल्या. व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत त्या समूहात नाचू लागल्या. कोरसमध्ये गाऊ लागल्या आणि तेथेच त्यांचे नशीब उघडले. चित्रपती व्ही शांताराम यांच्या ’झनक झनक पायल बाजे’ या 1955 सालच्या चित्रपटात नायिका संध्या यांच्या मागे चक्क ग्रुप डान्समध्ये काम करून जयश्री गडकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. इतक्या छोट्याशा संधीतून सुरुवात करून मग खूपच मोठी आणि यशस्वी वाटचाल आखणे अथवा घडवणे सोपे नाही, पण जयश्री गडकर यांनी ते सिद्ध आणि साध्य केले. त्याच वेळेस भारत भेटीवर आलेल्या बुल्गानिन या रशियन पाहुण्यांसमोर जयश्री गडकर यांनी सादर केलेल्या नृत्याचे फोटो राम देवताळे यांनी दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांना दाखवले. त्या फोटोतही जयश्री गडकर यांच्या नृत्य शैलीची ओळख झाली आणि पाटील यांनी आपल्या ’दिसतं तसं नसतं’ या चित्रपटात राजा गोसावी यांच्यापुढे एक नृत्य करण्याची संधी दिली. जयश्री गडकर यांचे असे आणखी एक पाऊल पुढे पडले आणि त्यानंतर त्यांची पावले सतत पुढेच पडत राहिली. राजा परांजपे दिग्दर्शित ’गाठ पडली ठका ठका’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा महत्त्वाची भूमिका मिळाली. ’आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली.
एकाच वेळेस भिन्न स्वरूपाच्या भूमिका हेदेखील जयश्री गडकर यांचे विशेष ठरले. त्यामुळे ’मानिनी’मध्ये त्यांनी सोज्वळ नायिका साकारली, तर ’रंगपंचमी’मध्ये तेवढ्याच ताकदीने तमासगिरीण साकारली.
पुणे शहरात एकदा दिलीपकुमार यांनी ’एक गाव बारा भानगडी’ पाहिला आणि जयश्री गडकर यांच्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, चांगला चित्रपट आहे. तो पाहताना वेळ कधी आणि कसा निघून गेला हे कळलचं नाही. रंजन करता करता बरंच काही सांगून जातो हा चित्रपट… दिलीपकुमारचे हे बोल जयश्री गडकर नेहमीच सांगत.
जयश्री गडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेताना अनेक महत्त्वाच्या मराठी चित्रपटांची नावे सांगता येतील. त्यांची नृत्यप्रधान भूमिका असलेल्या ’सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने 1959 साली पुणे येथील विजयानंद चित्रपटगृहात तब्बल 131 आठवड्यांचे घवघवीत यश संपादले आणि जयश्री गडकर स्टार झाल्या. त्यांनी काही हिंदी चित्रपटातही भूमिका साकारलीय.
अभिनेते बाळ धुरी यांच्याशी जयश्री गडकर यांचा 1975 साली विवाह झाला. विशेष म्हणजे त्यांच्या या विवाहाची बातमी तेव्हा आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांतून फोटोसह पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. लग्नानंतरही त्यांनी चित्रपटातून भूमिका साकारणे कायम ठेवले. रामानंद सागर यांच्या ’रामायण’ या लोकप्रिय मालिकेत बाळ धुरी आणि जयश्री गडकर या दोघांनीही भूमिका साकारली. त्यांनी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले. त्यांच्यासाठी हा अनुभव वेगळाच होता.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दीर्घकालीन अभिनय वाटचाल आणि अनुभव यावर त्यांनी आपले ’अशी मी जयश्री’ हे आत्मचरित्र लिहिले. पत्रकार वसंत भालेकर यांनी त्याचे शब्दांकन केले, तर जयश्री गडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांचे सहकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी वेध घेतलेले ’नक्षत्रांचे लेणे’ हे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे. जयश्री गडकर यांनी रुपेरी पडद्यावर अनेक तरी सुपर हिट गाणी साकारली. गीत संगीत आणि नृत्यातून जयश्री गडकर यांनी मराठी चित्रपट रसिकांना भरभरून आनंद दिला.
रंजना
एक अष्टपैलू आणि मेहनती अभिनेत्री म्हणून रंजना देशमुख हे नाव घेतले जाते. रंजनाची आई वत्सलाबाई देशमुख या मराठी आणि गुजराती रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेत्री होत. त्यांनी मराठी चित्रपटातही भूमिका साकारल्या. तर रंजना यांची मावशी संध्याजी यांनी नवरंग, पिंजरा अशा बहुचर्चित हिंदी आणि मराठी चित्रपटातून भूमिका साकारलीय. त्यामुळे लहानपणापासूनच रंजना यांच्यावर अभिनयाचे संस्कार होत गेले. चित्रपती व्ही शांताराम यांनी मराठीतील पहिला रंगीत चित्रपट ’इये मराठीचिये नगरी’ या चित्रपटात बालतारका म्हणून रंजना यांना पहीली संधी दिली. संध्या या चित्रपटाच्या नायिका होत्या आणि त्यांच्या म्हणजेच आपल्या मावशीच्या बालपणीची भूमिका रंजना यांनी त्यात साकारलीय. 1965 सालची ही गोष्ट आहे. तर 1977 सालच्या राजकमल कलामंदिरच्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ’चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटापासून रंजना यांनी छोट्याशा पण महत्वाच्या भूमिकेने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या रंगीत तमाशाप्रधान चित्रपटात रंजना यांनी लंका नावाच्या मोलकरीणीची फर्मास भूमिका साकारली. ही लंका तशी कजाग, नाचरी, कडकलक्ष्मी. रंजनाची रुपेरी वाटचाल सुरु झाली. किरण शांताराम दिग्दर्शित ’झुंज’, व्ही. शांताराम दिग्दर्शित ’चानी’ आणि अनंत माने दिग्दर्शित ’असला नवरा नको गं बाई’ असे त्यापाठोपाठच रंजनाचे महत्त्वाचे चित्रपट आले आणि रंजनाच्या अभिनय क्षमतेचा जबरदस्त प्रत्यय मराठी चित्रपटसृष्टी, रसिक प्रेक्षक आणि समिक्षकांना आला. ’रंजना नावाचे पर्व’ आता सुरू झाले आणि मग सुरू झाला रंजनाच्या चित्रपटांचा झंझावात. जवळपास प्रत्येक दोन चित्रपट झाल्यावर रंजनाचा चित्रपट प्रदर्शित होत राहिला आणि रंजनाची अभिनेत्री म्हणून क्षमता दिसू लागली. 1977 ते 1984 अशा या काळातील रंजनाचे चित्रपट गाजले. यातील अनेक चित्रपटांनी त्या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादलय.
महत्त्वाचे म्हणजे रंजनाने कधीच स्वतःला एका चौकटीत अडकवले नाही. अथवा कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्यास त्या कचरल्या नाहीत. नागिण, अरे संसार संसार, दैवत या चित्रपटात रंजनाने युवा ते वृद्धा अशा वयाची भूमिका साकारलीय. कधी रंजनाने शिक्षिका साकारलीय, तर कधी तमाशाच्या बोर्डावरील नाची, तर कधी अगदी खलनायिकाही साकारलीय. कधी पारंपरिक मराठी कौटुंबिक चित्रपट, तर कधी धाडसी कथानक, कधी विनोदी, तर कधी अ‍ॅक्शनबाज भूमिका साकारलीय. अशी विविधता द्यायची तर तेवढे कष्ट घ्यायला हवे. ’चानी’ साकारताना रंजनाने नारळाच्या झाडावर चढण्याचे कष्ट घेतले. याच भूमिकेसाठी पहाटे पाच वाजता उठून टेप केलेल्या संवादाचा सराव केला. रणजित देसाई यांच्या ’बारी’ या कथेवर आधारित ’नागिण’मधली नागी रंगवतानाही रंजनाने खूप कष्ट घेतले. ’तमासगीर’ या चित्रपटात उषा नाईकच्या आईची भूमिका साकारलीय. ’जखमी वाघीण’ या चित्रपटातील तिची बानू थेट हातात बंदूक घेणारी, ’देवघर’मध्ये त्यानी सेवाभावी डॉक्टर साकारली. ’लक्ष्मी’ या चित्रपटात जयमाला वकील साकारली. ’सुशीला’मध्ये पॉकेटमारी, थिएटरबाहेर सिनेमा तिकीटाची ब्लॅक मार्केटर ते देहविक्रय करणारी बिनधास्त युवती साकारली. सुशीला या चित्रपटातील नाची रंगवण्यापूर्वी रंजनाने लीला गांधी यांच्यासारख्या जाणकार नृत्यनिपुण अभिनेत्रींना घेऊन तमाशाच्या थिएटरमध्ये जाणे पसंत केले. तेथे दौलतजादा कसा वसूल होते ते अनुभवले. त्यामुळे ही भूमिका सकसपणे वठली. रंजना यांनी त्या काळातील मराठीतील सर्वच आघाडीच्या नायकांसोबत भूमिका साकारली. रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, राजा गोसावी यांच्यासोबत अनेक चित्रपटांतून भूमिका साकारली, पण जास्त जोडी जमली ती अशोक सराफ यांच्यासोबत.
अशी अतिशय प्रभावीपणे आणि जोशात, उत्साहात, मनसोक्त वाटचाल सुरू असतानाच 22 नोव्हेंबर 1984 रोजी एक मोठी दुःखद घटना घडली. शांतारामबापूंच्या ’झंझार’ या चित्रपटाच्या आऊटडोअर शूटिंगसाठी जात असताना बंगलोरजवळ रंजना यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. इतका मोठा की तब्बल चौदा महिने इस्पितळात उपचार घ्यावे लागले. सुरुवातीला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणि मग महालक्ष्मी हाजी अलीच्या एका इस्पितळात त्या उपचार घेत होत्या. शारीरिक धक्क्यासह हा भावनिक आणि मानसिक धक्काही होता. अनेक ऑपरेशन्स, इंजेक्शन, औषधे असा जणू एक न थांबणारा प्रवास सुरू राहिला, पण रंजनाचे आत्मबळ जबरदस्त होते. त्या हळूहळू बरे होत गेल्या तरी व्हीलचेअरवर बसणे नशिबी आले. विशेष म्हणजे थोडे बरे वाटल्यावर घरी आल्यावर रंजना यांनी ’हिचं काय चुकलं’ या चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले. अपघात होण्यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते आणि याचे डबिंग राजकमल कलामंदिर स्टुडिओत व्हावे म्हणजे घरच्यासारखे वाटेल अशी रंजना यांची भावना होती. या काळात मराठी चित्रपटसृष्टीत एकूणच चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एका झंझावातासारखा प्रवासात अनपेक्षितपणे खिळ बसली होती. स्पॉटबॉयपासून निर्मात्यांपर्यंत अनेक जण रंजना पुन्हा एकदा चित्रपटात भूमिका साकारण्यास सज्ज व्हाव्यात यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत होते. रंजना हळूहळू आपल्या परेल येथील घरात वावरू लागल्या, पण हालचालीवर बरीच बंधने होती. अशाच वेळी व्हीलचेअरवर असूनही अतिशय जिद्दीने त्यांनी ’फक्त एकदाच’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केले. अभिनयावर बेहद्द प्रेम असल्यानेच हे शक्य झाले. समीक्षक व प्रेक्षकांनी रंजना यांचे स्वागत केले. रंजना यांना सहानुभूती नको होती, तर त्यांना नाटक आणि चित्रपटात पुन्हा मन रमवायचे होते. या नाटकाचे काही प्रयोग झाले.
स्मिता पाटील
आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात स्मिता पाटील यशस्वी ठरल्या. वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे प्रस्थ, तर आई विद्याताई पाटील सामाजिक सेवेत.
रूपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. राष्ट्र सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने 1974 साली अरुण खोपकर यांच्या एफटीआयआयच्या ’तीव्र मध्यम’ या डिप्लोमा फिल्ममध्ये सर्वप्रथम काम केले, तर दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ’बातमीदार’ या नात्याने केली. छोट्या पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरून श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला ’निशांत’ आणि ’चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली.
अभिनेत्री म्हणून करिअर आकाराला येत जाताना स्मिता पाटील यांनी काही वेगळ्या जॉनरच्या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित बहुचर्चित ’जैत रे जैत’ आणि ’उंबरठा’ (हाच चित्रपट हिंदीत ’सुबह’ या नावाने निर्माण झाला), रामदास फुटाणे दिग्दर्शित ’सूत्रधार’, चंद्रकांत जोशी दिग्दर्शित ’सूत्रधार’ या चित्रपटांचा उल्लेख हवाच. ’उंबरठा’मध्ये स्मिता पाटीलने साकारलेली सुलभा महाजन ही स्री मुक्ती विचारांची स्री होती.
स्मिता पाटीलने आपल्या कारकिर्दीत समांतर चित्रपट अथवा न्यू वेव्ह चित्रपटात मोठ्या प्रमाणात भूमिका साकारल्या. समांतर अथवा कलात्मक चित्रपटात भूमिका साकारत असतानाच स्मिता पाटीलने निखिल सैनी दिग्दर्शित ’तजुर्बा’तून व्यावसायिक चित्रपटात पाऊल टाकले. तेथेही अनेक चित्रपटात भूमिका साकारली.
स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या गुणवत्तेची कायमच तुलना केली जाई. महेश भट्ट दिग्दर्शित ’अर्थ’मधील या दोघींचा अभिनयाचा सामना गाजला. श्याम बेनेगल दिग्दर्शित ’मंडी’मध्ये त्या दोघी पुन्हा एकमेकांसमोर आल्या. दोघींचेही समर्थक आपल्या अभिनेत्रीनेच अभिनयात बाजी मारली असे म्हणत.
स्मिता पाटील आणि पुरस्कार यांचे नाते अतिशय घट्ट आहे. काही उल्लेखनीय पुरस्कार सांगायचे तर ’जैत रे जैत’साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, ’भूमिका’ आणि ’चक्र’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, याखेरीज राष्ट्रीय एकता पुरस्कार, आशीर्वाद अवॉर्ड, जायंटस अवॉर्ड असे स्मिता पाटीलने असंख्य पुरस्कार पटकावले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ’भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. स्मिता पाटीलने मग मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात भूमिका साकारलीय. तेवढं तिचं अनुभव विश्व विस्तारले. स्मिता पाटीलने निर्माते किशोर मिस्कीन यांच्या चंद्रवदन दिग्दर्शित ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटात भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ’ सामना ’ या चित्रपटात या टोपीखाली दडलयं काय या गाण्यात डॉ. श्रीराम लागू यांच्या फ्लॅशबॅकमधील युवती त्यांनी साकारली. श्याम बेनेगल दिग्दर्शित ’मंथन’मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित श्याम बेनेगल दिग्दर्शित ’भूमिका’(1977)मधून त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्‍या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन, सुचित्रा सेन तसेच समकालीन शबाना आझमी यांनी या चाकोरीपलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. कॉस्टा गॅव्हाराससारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकाने 1984 साली फ्रान्समध्ये पॅरीस आणि ला रोशेल अशा दोन्ही ठिकाणी स्मिता पाटीलच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित केले. अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव आयोजित केली जाणारी स्मिता पाटील आशियातील पहिली अभिनेत्री आहे. मॉन्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा बहुमान स्मिता पाटीलला मिळाला. 1985 साली नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्मिता पाटीलला मिळाली.
चित्रपटात भूमिका साकारत असतानाच स्मिता पाटीलने बीज आणि वासनाकांड या वेगळ्या प्रवाहातील तसेच ’छिन्न’ या व्यावसायिक मराठी नाटकात भूमिका केलीय. विशेष म्हणजे अ‍ॅलेक पद्मसी दिग्दर्शित ’रिक्वेस्ट कॉन्सर्ट’ या एकपात्री नाटकातही स्मिता पाटीलने अभिनय केला. या सगळ्या प्रवासात स्मिता पाटीलने विवाहित राज बब्बरशी लग्न केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत नायिकांची भूमिका खूपच महत्त्वाची. त्यातील निवडक पाच अभिनेत्रीं वरचा हा फोकस. यांच्यासह प्रत्येक काळातील प्रत्येक अभिनेत्रीचा मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी वाटचालीत सहभाग आहे.

  • दिलीप ठाकूर, (चित्रपट समीक्षक)

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply