Friday , September 29 2023
Breaking News

लस आल्यानंतरची आव्हाने

भारतातही लस उपलब्ध होण्यासाठी आता फार काळ वाट पहावी लागणार नाही बहुतेक, परंतु देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येकापर्यंत ती पोहचायला निश्चितच बराच काळ लागणार आहे. लस आली की लगेच सारे काही आलबेल होईल, जीवन पूर्ववत जगता येईल असा समज अनेकांनी करून घेतलेला दिसतो, तो मात्र प्रयत्नपूर्वक दूर करावा लागणार आहे.

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाण बरेच खाली गेले होते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यातील कोरोना केसेस आणि मृत्यू सप्टेंबर-ऑक्टोबरशी तुलना करता जवळपास 50 टक्क्याने कमी झाले. दिवाळी, अनलॉकमुळे नव्याने सुरू झालेले बरेचसे व्यवहार आणि घसरलेली आकडेवारी याच्या एकत्रित परिणामातून कोरोना जणु काही संपुष्टात आल्यासारखे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नोव्हेंबरअखेरीस चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवण्यात आली आणि पुन्हा आकडे वाढू लागले. डिसेंबरअखेर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात कोरोना फैलावाची दुसरी लाट येईल असा इशारा वारंवार दिला जातो आहे. पण दखल कोण घेतो? राज्यातील कोरोना परिस्थिती तूर्तास नियंत्रणाखाली आहे असे राज्य सरकारकडून सांगितले जाते आहे. परंतु डिसेंबर अखेरीपर्यंत ही परिस्थिती बदलू शकेल असेही आरोग्यमंत्री सांगत आहेत. त्यामुळेच विशिष्ट भागांमध्ये ठराविक लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. अशातच लस उपलब्ध होण्यासंदर्भातील घडामोडींनी जागतिक तसेच देश पातळीवरदेखील वेग घेतला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीची सर्वपक्षीय नेत्यांसोबतची बैठक पार पडली. देशात तीन लसी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. या लसी उपलब्ध झाल्यावर त्या आरोग्य क्षेत्रातील तसेच प्रत्यक्ष कोरोना आघाडीवर काम करणार्‍या अन्य कर्मचार्‍यांना प्राधान्याने दिल्या जातील. वृद्ध तसेच गंभीर आजारांचा सामना करणार्‍यांनाही लस प्राधान्याने दिली जाईल, असे मोदीजींनी स्पष्ट केले. सध्या देशभरात सर्वाधिक केसेस केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातून नोंदल्या जात आहेत. लसीचे वितरण आणि साठा ही लगेचची आव्हाने सर्वच देशांसमोर आहेत. खेरीज लसीचा प्रभाव किती काळ टिकणार, हाही एक मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. लसीमुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारक क्षमता दीर्घकाळ टिकेल की कोरोनापासून बचावासाठी पुन्हा पुन्हा लस घ्यावी लागेल यांसारख्या प्रश्नांची उत्तरे येणार्‍या काळातच स्पष्ट होणार आहेत. लसीची गरज प्रत्येकाला आहे, परंतु कोरोनाचा धोका काहींना अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना लस प्राधान्याने द्यावी लागणार आहे. या गरजेतून तसेच कोरोनाच्या भीतीपोटीही इतरांना डावलून अग्रक्रमाने लस मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला हाताशी धरण्याचे वा दबाव आणून सरकारी याद्यांमध्ये नावे घुसडण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणाही राजकीय वा अन्यथा प्रभावशाली व्यक्तीकडून अशातर्‍हेचा दबाव येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यातूनच असले प्रकार सुरू झाल्याचे संकेत मिळतात. बनावट लसींपासून सावध राहण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच दिला आहे. इतक्या कमी काळात विकसित केल्या गेलेल्या लसी हे मानवी प्रयत्नांचे अभूतपूर्व यश असले तरी प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतर त्याकडे बारकाईने लक्ष देखील ठेवावे लागणार आहे. निरनिराळ्या देशांमधील विभिन्न लसींच्या कमीअधिक प्रभावानुसार सगळ्यांचीच पुढील वाटचाल ठरणार आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply