भाजप नगरसेवक आणि पदाधिकार्यांचे प्रत्युत्तर
पेण : प्रतिनिधी
माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी पेणमधील नागरिक आणि पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना देशोधडीला लावले आहे. त्यांना पेण पालिकेबाबत बोलण्याचा अधिकार नाही तसेच त्यांचे आमदार रविशेठ पाटील यांच्याबाबत बालिश आणि बेताल वक्तव्य भाजप कदापि सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देले जाईल, अशा शब्दांत पेण भाजप आणि नगरसेवकांनी धारकर यांना सुनावले आहे.
शिशिर धारकर यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी नगरसेवक अजय क्षीरसागर आणि भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 21) पेण येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रशांत ओक, भाजप युवा मोर्चा पेण शहर अध्यक्ष मितेष शाह, माजी नगरसेवक बाळू जोशी उपस्थित होते. त्यांनी धारकरांचा जोरदार समाचार घेतला.
ओक, शाह, जोशी यांनी सांगितले की, पेणकरांचा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांच्यावर आहे हे नऊ हजार मतांची आघाडी पेणमधून देऊन जनतेने सिद्ध केले आहे. ज्या दिवशी पेण अर्बन बँक बुडाली त्याच दिवशी संध्याकाळी धारकर यांनी माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांच्याकडे येऊन लोटांगण घालून मदत मागितली होती. त्या वेळी पक्षीय राजकारण न करता रविशेठ पाटील यांनी केवळ ठेवीदारांच्या हिताचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची गाठ घालून दिली. त्या वेळी शिशिर धारकर यांनी आपण दर महिन्याला 50 कोटी बँकेत भरून ठेवीदारांचे पैसे परत करू, असे कबूल केले होते, मात्र तो शब्द धारकरांनी पाळला नाही. त्यामुळे बँक बुडून अनेक ठेवीदारांचे संसार उद्ध्वस्त झाले ही वस्तुस्थिती आहे.
शहरातील रिंग रोडसाठी केलेले आरक्षण हे धारकर यांच्याच कार्यकाळात संतोष शुंगारपुरे नगराध्यक्ष असताना झालेले आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे नगरसेवक क्षीरसागर यांनी सांगितले.
सफाई ठेक्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. 10 वर्षांपूर्वी धारकरांची सत्ता असताना 60 ते 80 रुपये सफाई कामगारांना रोज दर दिला जायचा, परंतु आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या गोरगरीब सफाई कामगारांना न्याय मिळवून दिला. नियमाप्रमाणे त्यांना रोज 350 ते 400 रुपये पगार दिला जातो. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी असलेला 34 लाखांचा ठेका हा आता तीन कोटींवर गेला असल्याचे नगरसेवक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
पेण शहरातील नागरिकांना प्रत्येक वॉर्डमध्ये शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा वेळेवर होत आहे. नगराध्यक्ष प्रितम पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वात पेण शहरात डांबरीकरण केलेले रस्ते, गॅस पाइपलाइन, पथदिवे, प्रत्येक प्रभागात स्वच्छता रोज होत असते. विजेचे नवीन खांब आणि पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम, त्याचबरोबर नागरिकांना लागणार्या सर्व मूलभुत गरजा नगर परिषदेकडून पुरविल्या जात आहेत. जे धारकरांना त्यांच्या सत्तेच्या 25 वर्षांत जमले नाही त्याच्या 100 पटीने विकास आम्ही करून दाखविला आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
पेण नगर परिषदेवर शिशिर धारकर यांची सत्ता असताना शहराच्या पाणीपुरवठा योजनेकरिता शासनाकडून आलेले पाच कोटी रुपये तत्कालीन नगराध्यक्ष संतोष शुंगारपुरे यांनी बेकायदेशीररित्या शासकीय बँकेत न ठेवता ही रक्कम तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर दबाव टाकून पेण अर्बन बँकेत ठेवली होती. त्यानंतर बँक बुडाली. त्यामुळे शहराची पाणीपुरवठा योजना अडकून राहिली होती, परंतु माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाणीपुरवठा योजनेसाठी पुन्हा निधी उपलब्ध करून दिल्याने आज पेणच्या नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे, असे उपस्थितांनी नमूद केले.
शिशिर धारकर यांनी केलेले बिनबुडाचे आरोप सिद्ध करावेत; अथवा भारतीय जनता पक्ष त्यांना सडेतोड उत्तर देईल तसेच पालिकेच्या आगामी निवडणुकीत पेणची जनता बँक बुडव्यांना हद्दपार करेल, असा विश्वास या वेळी भाजप युवा मोर्चा पेण शहर अध्यक्ष मितेष शाह यांनी व्यक्त केला.