खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील भिलवले धरण पूर्णपणे भरून ओसंडून वहात आहे, त्याच पाण्याच्या प्रवाहातून सोमवारी (दि. 29) चार किलो वजनाची एक मगर
बाहेर आली.
भिलवले धरणातून यापूर्वी तीन मगरी पकडून वन खात्याकडे सुपूर्द केल्या आहेत. आज पुन्हा पाण्याच्या प्रवाहातून चार किलो वजनाची मगर बाहेर आली. स्थानिक मजूर सोमनाथ वाघमारे, मारुती वाघमारे, विकास कातकरी हे धरणाच्या खाली नदीकडेला मासेमारी करीत असताना त्यांना ही मगर दिसली. त्यांनी ही बाब भिलवले गावाचे पोलीस पाटील अनंत पाटील यांना सांगितली. त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावून घेतले. रुपेश सुर्वे, रामदास वाघमारे, लहाणू वाघमारे, मोहन ठोंबरे, सुभाष वाघमारे यांच्या मदतीने दगड-चिखलातून मगरीला शोधून ती सुरक्षित पिंजर्यात ठेवली व पोलीस पाटील अनंत पाटील यांनी त्वरित वन विभागाच्या अधिकार्यांना भ्रमणध्वनीद्वारे खबर दिली. वनरक्षक जी. ओव्हाळ, के. एस. खोत यांनी पंचनामा करून मगरीला खालापूर येथे घेऊन गेले.
या पूर्वी भिलवले धरण परिसरातून चार मगरी वन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. या मगरी कुठून आल्या याबाबत संभ्रम आहे. मगरींच्या वावराने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने हा परिसर मगर प्रणव क्षेत्र म्हणून जाहीर असून कुणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे.