माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
माणगाव : प्रतिनिधी
किरकोळ वादातून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 27) जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदरची घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव येथे घडली होती.
आरोपी महादेव गजानन पाटोळे (रा. केरेवाडी, ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली) आणि मयत साहेबराव जयवंत चव्हाण उर्फ नाना हे गणपत निकम यांच्या बोरगाव येथील खडी क्रिशरवर ड्रील मारण्याचे काम करत होते. ते कॉरीवर बोरिंग गाडीतच राहून जेवण करून तेथेच झोपायचे. आरोपी महादेव पाटोळे व मयत साहेबराव चव्हाण यांच्यात कामावरून वाद होवून आरोपी याने साहेबराव चव्हाण यांना स्टीलच्या पाईपने मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले.
या घटनेची फिर्याद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली. या गुन्ह्याच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केला व आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अतिरीक्त सहजिल्हा न्यायाधीश यांच्या समोर झाली. सदर गुन्ह्यात साक्षीदारांच्या साक्ष व वैद्यकीय तसेच तांत्रिक पुरावा महत्त्वाचा ठरला. सदर खटल्यामध्ये अॅड. जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पहिले व कोर्टासमोर
प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यु. एल. धुमास्कर, पोलीस हवालदार छाया कोपनर, शशिकांत कासार, पोलीस हवालदार शशिकांत गोविलकर, शिपाई सुनील गोळे, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. न्या. टी. एम. जहांगिरदार यांनी आरोपीला दोषी ठरवून बुधवारी आरोपी महादेव गजानन पाटोळे याला भादविक 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा व 20हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.