पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल जिल्हा रायगड यांच्यामार्फत या वर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या कल व अभिक्षमता अहवालानुसार करिअर करण्याच्या दृष्टीने व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल येथे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कल अहवालानुसार विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम निवडावा यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी तालुका समुपदेशक म्हणून व्ही. जी. पाटील आणि नंदिनी भाटकर हे उपस्थित असतील. सदरची सेवा 12 एप्रिल ते 30 एप्रिल 2019 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2.00 पर्यंत चालू राहील.विद्यालय स्तरावर देखील ही सेवा प्रत्येक शाळेत उपलब्ध आहे.त्यासाठी अविरतचे प्रशिक्षण घेतलेले दोन शिक्षक आणि मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. पालक आणि विद्यार्थी यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल जिल्हा रायगडचे प्राचार्य सुभाष महाजन आणि अविरतचे जिल्हा समन्वयक दिनेश चौधरी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक विनायक खरे यांनी केले आहे. केंद्रात येताना विद्यार्थ्यांनी आपला कल व अभिक्षमता चाचणी अहवाल आणावा. अधिक माहितीसाठी नंदिनी भाटकर 9769555099 आणि व्ही. जी. पाटील 9969348934 यांच्याशी संपर्क साधावा.