कर्जत : बातमीदार
तालुक्यातील जिते गावातील म्हशींचा तबेला 20 एप्रिल 2022 रोजी रात्रीच्या अंधारात जाळण्यात आला होता. त्याबद्दल आरोप असलेल्या व्यक्तींना नेरळ पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. दरम्यान, त्या आगीमध्ये होरपळलेल्या एका म्हशींचा मृत्यू झाला असून शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील जिते गावातील शेतकरी धनाजी घरत, त्यांचे वडील सदानंद घरत आणि भाऊ सतिष घरत हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. जिते गावच्या हद्दीत गावठाण जागेत जनावरचा गोठा असून त्यात 35 म्हैशी आणि पेंढा व कड़बा ठेवण्यात आला होता. या गोठ्याला 20 एप्रिल 2022 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यात भाताचा पेंढा आणि कडबा जळून सुमारे एक लाख 40हजार 440 रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच गोठ्यातील तीन म्हैशीं होरपळल्या होत्या. त्यांच्यावर वाकस येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बागुल यांनी जिते येथे जाऊन उपचार केले होते. मात्र त्यातील एक म्हैस गुरुवारी (दि. 5) मृत झाली असून त्याचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्यात 65 हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. गोठा, जनावरे आणि पशूखाद्य यांचे नुकसान करणार्यांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.