वडखळ येथे आगरी सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात
पेण : प्रतिनिधी
आगरी समाजाचे अस्तित्व जपणार्या संस्थेची ताकद मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्यासाठी तरुणाईने संस्थेच्या कार्यात उतरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी येथे केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच वडखळ येथील अभ्यास केंद्र सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली. या वेळी सूर्यकांत पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते. संस्थेकडून समाज बांधवांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. समाजाच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून त्या समस्यांची सोडवणूक करणे, विखुरलेल्या स्वरुपातील आगरी समाजाची संघटित शक्ती उभी करणे, येणार्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणे. ही संस्थेने उचललेली निर्णायक पावलं समाजाला चांगलीच भावली आहेत. समाजाविषयी आस्था, अस्मिता आणि अभिमान बाळगून सामाजिक बांधिलकी जपणार्या युवा कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्यावर संस्थेने भर दिला असल्याचे सांगून सूर्यकांत पाटील यांनी या वेळी मूलभूत प्रश्नांबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांवर नोकरभरतीत होणार्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा इशारा दिला. संस्थेने अनेक उपक्रमांचे संकल्प सोडले असून, त्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जाणत्या, परिपक्व कार्यकर्त्यांची गरज आहे. याकरिता राजकीय बंधने तोडून समाजाच्या कामात समर्पित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संस्थेचे ट्रस्टी संजय ठाकूर यांनी केले. या वेळी एस. पी. पाटील, नलिनी पाटील, पी. वाय. पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.