पाणी पुरवठ्यासाठी सरपंच, सदस्य सरसावले;स्वखर्चाने ट्रँकर सुरू
कर्जत : बातमीदार : तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतहद्दीत तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्यांनी स्वखर्चाने ट्रँकर सुरू केले आहेत. कर्जत तालुक्यातील मोग्रज भागात असलेल्या मेचकरवाडी, जांभूळवाडी, मोग्रज वाडी, आनंदवाडी, मालेगाव, जाधववाडी, आनंदवाडी या आदिवासी वाड्यात आणि मोग्रज, धामणी, पिंगळस, खानंद या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथील पिण्याची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी मार्च महिन्यापासून ट्रँकरचे पाणी देण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. कर्जत तालुका पाणी पुरवठा कृती आराखड्यात या ग्रामपंचायतीमधील सर्व गावांचा समावेश आहे. यातील अनेक गावे आणि वाड्यांना ट्रँकरने पाणी पुरवठा करावे, यासाठी निवडणूक काळात परवानगी देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा देशमुख, उपसरपंच विलास भला आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वखर्चाने सोमवार (दि. 6) पासून ग्रामपंचायतहद्दीतील टंचाईग्रस्त वाडी आणि गावात ट्रँकरचे पाणी पोहचवत आहेत. या पाणी पुरवठ्यासाठी मेचकरवाडीच्या दोन वाड्या, धामणी, पिंगळस, खानंद असा एक मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर दुसरा मार्ग हा मोग्रजवाडी, मोग्रज गाव, आनंदवाडी, जाधववाडी, फणसवाडी, मालेगाव, जांभूळवाडी असा निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य या सर्व भागात आपल्या खर्चाने ट्रँकर सुरू करून पाणी पुरविणार आहेत. त्यासाठी सरपंच रेखा देशमुख, उपसरपंच विलास भला यांच्यासह सदस्य गणेश लेकुरे, शिवाजी सांबरी, प्रकाश थोराड, मंगेश आगीवले, वर्षा मराडे, प्रमिला शीद, योगिता मेचकर, नाजूका पारधी, बेबी ठोंबरे, संगीता भला, मीनाक्षी भोईर, आशा रसाळ यांनी खिशाला चाट देऊन पिण्याचे पाणी ग्रामस्थांना पुरविण्याचे धोरण निश्चित केले आहे. तीन ट्रँकरद्वारे पावसाळा सुरू होईपर्यंत शुद्ध पाणी पुरविण्याचे काम करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई लक्षात घेऊन ट्रँकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ट्रॅकरचे पाणी पोहचविण्याचे नियोजन केले असून, तसे आर्थिक नियोजन करण्याचा प्रयत्न आहे.
-विलास भला, उपसरपंच, ग्रुपग्रामपंचायत मोग्रज, ता. कर्जत