पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी (दि. 30) सायंकाळी लाल मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याने या चारपदरी महामार्गाच्या एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, मात्र त्याकडे ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याने उशिरापर्यंत हा लालमातीच्या दरडीचा ढिगारा तसाच पडून राहिला. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटाच्या सुरुवातीला चोळई गावापासूनच एका बाजूला डोंगर कापून काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर गेल्या चार वर्षांत अनेक वेळा दरडी पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारनंतर चोळई येथे दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर संरक्षक कठड्यावरून हा मातीचा ढिगारा काँक्रिटच्या रस्त्यावर आला. त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू असल्याने ठेकेदार कंपनीने दरडीचा ढिगारा हलविण्याचे काम टाळले. त्यामुळे चारपदरी महामार्गापैकी दोनपदरी रस्ता बंद झाला.