2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग भरला जात होता. करिना कपूरने जवळपास सर्वच गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आपल्या ग्लॅमरस छबीने लक्ष वेधून घेतले होते. (ती कपूर असल्याने तिचे चित्रपटसृष्टी व मीडियाने स्वागत केले यात आश्चर्य नाही हो) तिच्या झळाळीत मुझे कुछ कहना हैचीही हवा होतीच. तरी जितेंद्र पुत्र फोकसमध्ये यायला हवा होताच. स्टार पुत्र हा एक महत्त्वाचा फंडा.
आणि अशातच जुहू विलेपार्ले स्कीममधील गुलमोहर सोसायटीतील जितेंद्रच्या कृष्णा बंगल्यावर मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले आणि यानिमित्त माझा जितेंद्रच्या बंगल्याशी पहिल्यांदा परिचय झाला.
पूर्वीचे अनेक कलाकार आपल्या प्रशस्त घरातील म्हणा वा बंगल्यातील म्हणा, आम्हा सिनेपत्रकारांसाठी आयोजित केलेल्या पार्टीत कधीच कंजुषी करत नसत (हात आखडता घेत नसत. म्हणूनच त्या पार्ट्या यादगार ठरल्या.) कृष्णा बंगल्यातील अगदी वरच्या मजल्यावरील या पार्टीत बबिता व करिना कपूरही छान रमल्या. (कलाकारांच्या घर वा बंगल्यातील आम्हा मिडियासाठीच्या पार्ट्या हा एक आठवणीत झक्कास ओला विषय)
जितेंद्र मुळचा आमचा गिरगावकर. मराठीत बोलणारा/ऐकणारा. या पार्टीचा तो यजमान. त्यामुळे तो आम्हा सिनेपत्रकारांशी छान गप्पांत रमला. चित्रपती व्ही.शांताराम यांच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत तो कार्यरत असल्यापासूनच्या काही आठवणी त्याने सांगितल्या. व्ही.शांताराम यांचा त्याने अतिशय आदराने अण्णा असा केला. याच गप्पांत त्याची वेगळी भूमिका असलेला चित्रपट कोणता? असे मी विचारता, तो पटकन म्हणाला, परिचय…
या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास बावन्न वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मला हा क्षण आठवला. (1 डिसेंबर 1972 रोजी मुंबईतील लिबर्टी चित्रपटगृह व इतरत्र तो प्रदर्शित झाला. गुगलवरील 20 ऑक्टोबर 1972 ही तारीख परिचय सेन्सॉर संमत झाल्याची आहे.)
‘फर्ज’च्या यशाने जितेंद्र स्टार झाला आणि त्याला मसालेदार मनोरंजक चित्रपटातून भूमिका मिळाल्या. त्यात काय करायचे होते? नायिकेवर प्रेम प्रेम प्रेम (त्या काळात एकाच प्रेम गीताचा कोटा पुरेसा ठरत नसे..कधी एकादे विरह गीतही), त्यात नृत्याच्या नावाने शक्य तेवढी नायिकेशी जवळीक, धक्के वा घसट, आईशी ममतेचे नाते (आईने बनवलेला गाजर का हलवा तर जवळपास सर्वच चित्रपटात), कॉमेडीसोबत मौज मजा आणि क्लायमॅक्सला व्हीलनची पिटाई (पुष्पा 2 एन्जॉय करताना पन्नास वर्षांपूर्वीच्या हिंदी चित्रपटातील ढिश्यूम ढिश्यूम अगदीच अळणी नि बेचव हो. असो.) हे करत करत राहिल्याने पिक्चरची संख्या वाढत राहील, पण दर्जेदार अभिनेता असा आपला परिचय नाही हो होणार.
हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जितेंद्र केवळ जम्पिंग जॅक हिरो नाही, त्याला अभिनयही येतो यावर चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि त्या काळातील मुद्रित माध्यमे यांनी पहिल्यांदाच विश्वास ठेवला. ती एक प्रकारची मिळकत. अशा प्रकाराचा आपल्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे ही तेव्हा जितेंद्रची एक व्यावसायिक गरजही होती, म्हटलंत तर ’खेळी’ही होती. या चित्रपटाला चक्क बावन्न वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त हा फोकस.
जितेंद्रच्या प्रगती पुस्तकातील सुरुवातीचे गुण हिट गाण्यांचे. या गाण्यांचा रेडिओ, लाऊडस्पीकर ते यू ट्यूब असा यशस्वी प्रवास सुरूच आहे. रवी नगाईच दिग्दर्शित ’फर्ज ’मधील मस्त बहारोंका आशिक मै जो चाहू प्यार करू, बार बार दिन ये आऐं, रामन्ना दिग्दर्शित ’हमजोली’मधील हाय रे हाय नींद नही जाय, ढल गया दिन हो गयी श्याम, नासिर हुसेन दिग्दर्शित ’कारवा’मधील चढती जवानी मेरी चाल मस्तानी, कितना प्यारा वादा है, गोरियां कहा तेरा देश रे, रामन्ना दिग्दर्शित ’वारीस’मधील लहरा के आया है, एक बेचारा प्यार का मारा, कभी कभी ऐसा भी तो, रविकांत नगाईच दिग्दर्शित ’हिम्मत’मधील शुकर के तू है लडका, मान जाईऐ मान जाईऐ अशा अनेक सुपर हिट गाण्यांतील जितेंद्रचे धसमुसळे नाचणे, कंबर हलवणे, नायिकांना धक्के देणे यामुळेच त्याची ’उछलकूद हिरो’ अशी इमेज झाली, पब्लिकला ती भारी आवडली आणि अशा डान्सर हीरोला प्रतिष्ठा मिळत नाही. (काय एकेक अलिखित नियम. चित्रपटसृष्टीत अशाच अनेक रंगांची रेलचेल) तो सवंग एन्टरटेनर म्हणून दुर्दैवाने ओळखला जातो. तशा मसालेदार मनोरंजक चित्रपटातून भूमिका करतानाही कस लागतोच हो. आपला चित्रपट गीत संगीत व नृत्य यामुळेच जगापेक्षा अगदी वेगळाच असल्याने ते रूपेरी पडद्यावर साकारणारा हीरो महत्त्वाचा असतो. (जुन्या व्याख्या बदला हो. आपलाही चित्रपट खूप पुढे गेला आहे.). तुलनेत अभिनेत्रींच्या रूपेरी नृत्याला सकारात्मक दाद अशीच दीर्घकालीन परंपरा. वैजयंतीमालापासून माधुरी दीक्षितपर्यंत नावे घ्यावीत तेवढी थोडीच. शास्त्रीय नृत्यापासून आयटेम साँगपर्यंतचा हा प्रवास.
तात्पर्य, जितेंद्रला ’नाचो हिरो’ या प्रतिमेतून बाहेर यायचंय आणि त्यासाठी त्याचा भाऊ प्रसन्न कपूर यानेच तिरुपती पिक्चर्स या बॅनरखाली चित्रपट निर्मिती करायचे ठरवले. दिग्दर्शक म्हणून गुलजार हेच योग्य नाव होते. ते दिवस राजेश खन्नाच्या क्रेझने व्यापलेले होते. एक प्रकारचा तो हिस्टेरियाच होता. जितेंद्रलाही याचा फटका बसला होताच. अशा वातावरणात गुलजार दिग्दर्शित ’परिचय’ उत्तम संधी. राजकुमार मैत्रा यांच्या ’कारंजी उतरैन’ या बंगाली कादंबरीवर आधारित गुलजार आणि डी.एन. मुखर्जी यांनी पटकथा लिहिली. साहित्यावर आधारित चित्रपट हेदेखील त्या काळातील वैशिष्ट्य (आजही ते अधूनमधून पडद्यावर दिसते. ढाई आखर हे ताजे उदाहरण) गुलजार यांचेच साहित्यिक संवाद. चित्रपटात जितेंद्र, जया भादुरी, प्राण, असरानी, गीता सिद्धार्थ, वीणा, लीला मिश्रा, पेंटल, केश्तो मुखर्जी तसेच विशेष भूमिकेत संजीवकुमार आणि पाहुणा कलाकार विनोद खन्ना. तर गुलजार यांच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत. जे आजही लोकप्रिय आहे.
तो काळ अनेक बाबतीत वेगळाच. घोषणेपासूनच छोट्या छोट्या बातम्यांतून चित्रपट रसिकांसमोर राही आणि मग चित्रपट पूर्ण होत असतानाच त्याची तबकडी प्रकाशित होई. रेकॉर्ड विक्रीच्या दुकानातील बाहेरच्या शो केसमध्ये तबकडीचे कव्हर पाहण्यातही आनंद मिळे. गुलजार यांच्या गीताना आर.डी. बर्मनचे संगीत म्हणजे, कधी एकदा ही नवीन गाणी ऐकतोय असे होणारे. मुसाफिर हू यारो (पार्श्वगायक किशोरकुमार), बीती ना बीताई रैना (लता मंगेशकर व भूपिंदर सिंग), मिठे बोल बोले (भूपिंदर सिंग), सा रे सा रे (आशा भोसले आणि किशोरकुमार) ही गाणी लोकप्रिय झाली. बिनाका गीतमालामध्ये मुसाफिर हू यारों… बर्याच वरच्या क्रमांकावर आलेदेखील. जितेंद्रचे वेगळे रूप हे ’परिचय’चे विशेष आकर्षण आणि उत्सुकता. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट असा विविध माध्यमातून पोहचतो. हा प्रवासही महत्त्वाचा.
’परिचय’ची थीम अगदी थोडक्यात सांगायलाच हवी. आर्मीतील निवृत्त अधिकारी राजसाहेब (प्राण) याना आपल्या रमा (जया भादुरी आणि मास्टर राजू वगैरे) आणि इतर नातवंडांसाठी चांगला शिक्षक हवा आहे, कारण जो जो शिक्षक येतो त्याला ही नातवंडे सळो की पळो करून सोडतात. अखेर रवी (जितेंद्र) येतो. या शिक्षकालाही तोच अनुभव येतो, पण तो हळूहळू आपल्या संयमित व खेळकर वागण्यातून सगळ्याना आपलेसे करतो. राज साहेब यांचा मुलगा नीलेश (संजीवकुमार) हा संगीतात विशेष रस घेणारा असतो. त्याच्या आणि त्याची पत्नी सुजाता (गीता सिद्धार्थ) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी राज साहेबवर असते. चित्रपटात आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेतच. संकलन वामन गुरू यांचे आहे. या चित्रपटाची मूळे ’साऊंड ऑफ म्युझिक’ या विदेशी चित्रपटात सापडतात असे म्हटले गेले असले तरी त्याचे आपल्याकडील चित्रपटातील सादरीकरण उत्तम जमलंय हे महत्त्वाचे. आपल्या देशातील चित्रपटाचे वैशिष्ट्य जमणे आवश्यक असतेच.
…’परिचय’ प्रदर्शित झाला आणि रसिकांनी त्याला आपलासा केला. चित्रपटाच्या स्वरूपानुसार त्याचे मुंबईतील मेन थिएटर लिबर्टी अगदी परफेक्ट. नवीन रुपातील जितेंद्र रसिकांना आपलासा वाटला. जयाचे रूपडं तसे परिचित, पण जितेंद्र अगदी संयमित आणि सरळ वृत्तीचा होता. त्याने गुलजारजींना भरपूर सहकार्य दिल्याचे पडद्यावर उतरले. चित्रपटाच्या यशाने जितेंद्रची गाडी पुन्हा रूळावर आली आणि एका बाजूस कौटुंबिक मनोरंजक चित्रपटातून भूमिका साकारत असतानाच दुसरीकडे गुलजार दिग्दर्शित ’खुशबू’ (1975), ’किनारा’ (1977) अशा कथाप्रधान चित्रपटांतूनही त्याने भूमिका साकारत आपली वाटचाल यशस्वीपणे पुढे सुरू ठेवली. तेच तर महत्त्वाचे असते. त्यासाठी जितेंद्रसाठी टर्निंग पॉईंट ठरला, गुलजार दिग्दर्शित ’परिचय’. जितेंद्रचा नवा परिचय करून देणारा चित्रपट.
जितेंद्र म्हटलं की जम्पिंग जॅक, आदर्श फिटनेस फंडा, पक्का व्यावसायिक, उत्तम कारकीर्द व्यवस्थापक, आपल्या मर्यादा ओळखून काम करणारा कलाकार, नायिकांच्या बदलत्या पिढीसोबत छान जुळवून घेणारा अभिनेता हे तर सगळेच आहे, उगाच का तो यशस्वी ठरला. उगाच नाही हो तो आपलीही ओळख निर्माण करु शकला? त्याचा भाऊ प्रसन्न कपूर चित्रपट निर्माता झाला, त्याचा मेव्हणा रमेश सिप्पी चित्रपट वितरक होते (शोले प्रसिद्ध रमेश सिप्पी वेगळा. हे केवळ नामसाम्य. फिल्मी दुनियेत एकाच नावाचे दोघे हादेखील रंजक विषय). त्याचे गिरगावातील प्रसाद चेंबर्स या भव्य इमारतीत बी.आर.ए. एन्टरप्राईजेस लिमिटेड असे चित्रपट वितरण कार्यालय होते आणि जितेंद्रची भूमिका असलेले अनेक चित्रपट याच चित्रपट वितरण संस्थेकडून प्रदर्शित होत. जितेंद्रसाठी ही अतिशय उत्तम व व्यावसायिक अशी सपोर्ट सिस्टीमच होती. एखाद्या व्यवसायात मुरायचे म्हणजे अशी अनेक स्तरावर आपली बाजू बळकट करावीच लागते. एकाद्या कलाकाराचे किती चित्रपट सुपर हिट व किती अपयशी ठरले या गणिती प्राणायामापलिकडे जाऊन बरेच काही असतेच. जितेंद्र त्यासाठी उत्तम केस स्टडी (अथवा अभ्यासासाठी उत्तम मॉडेल). त्यासह त्याच्या प्रगती पुस्तकात त्याचा गुलजार नमस्कार परिचयमधील अभिनय (कोणी म्हणतात त्याने त्यात अभिनयाचा प्रयत्न केला.) जितेंद्रशी आपला परिचय बहुस्तरीय आहे हेच केवढे तरी महत्त्वाचे.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक