पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या ’रामबाग’ या निसर्गरम्य उद्यानाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 22) श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधासभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी रामबाग साकारली आहे. 14 एकर जागेतील या उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पाँईंट, मचवा, पाण्याचे कारंजे अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायंकाळी या उद्यानाचे रूप बदलते, त्या वेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
न्हावेखाडी येथे म्हसेश्वर मंदिर या ठिकाणी अतिसुंदर असलेल्या या रामबाग उद्यानाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी सायंकाळी 5.30 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद, तर रात्री 8 वाजता पंचम निर्मित व गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत 70 कलाकारांचा संच असलेला ’महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ हा पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सी.एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील यांनी केले आहे.