दांडफाटा येथे कारवाई; दोन बंदुका, काडतुसे जप्त
अलिबाग, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
अवैधपणे गावठी बंदुका (कट्टा) विकणार्याला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) खालापूर तालुक्यातील दांड फाटा येथून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बंदुका व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इब्राहिम मोहंमद उमर शेख (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी महिती रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेेंडे यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. एलसीबीचे पोलीस नरीक्षक दयानंद गावडे या वेळी उपस्थित होते. मुंबईतील चिता कॅम्प-ट्रॉम्बे येथे राहणारा इब्राहिम शेख हा गावठी बंदुका अवैधरित्या विकण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांडफाटा परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून इब्राहिम शेख यास अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी बंदुका व दोन काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम अधिक तपास करीत आहेत.
सहा जण हद्दपार
रायगड पोलिसांनी 2022 या वर्षात सहा जणांना रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले. यात दोन टोळ्यांतील पाच जणांचा समावेश आहे, तर एकाला स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी महिती अपर पोलीस अधीक्षक अतुले झेंडे यांनी दिली. कर्जत येथील टोळीप्रमुख करण भरत थेर (सापेले) व त्याचा साथीदार विशाल प्रसाद भोईर (वंजारवाडी) यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीप्रमुख गौरव रवींद्र सोनावळे याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य पप्पू उर्फ प्रशांत डांगरे व प्रमोद पाटील यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी येथील बिलाल इस्माईल जिवरक याला एक वर्षासाठी तर रोहा तालुक्यातील वरवटणे यथील चंद्रकांत म्हात्रे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.