अलिबाग ़: प्रतिनिधी
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्या जन शिक्षण संस्थान-रायगड या संस्थेतर्फे सोमवारी (दि. 18) चिखले (ता. पनवेल) येथील आदिवासी आश्रम शाळेत स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक विजय कोकणे आणि व्यवस्थापक मंडळाच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. चिखले आश्रम शाळेतील सोमवारी घेतलेल्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच विद्यर्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे व सर्व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. या वेळी स्वच्छतेवर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. जन शिक्षण संस्थानचे संचालक विजय कोकणे, मुख्याध्यापक विष्णू गायकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक श्रद्धा साळुंखे, राजेंद्र गर्जे, पूजा गायकर, अंजली भोईर, कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे, कर्मचारी हिमांशू भालकर या वेळी उपस्थितीत होते.