मुरूड : प्रतिनिधी
संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरूडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील रुग्णांना डायलिसिस सेवा देत असून, रुग्णांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे यांनी मुरूड येथे केले.मुरूड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेला आश्रयदाते डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या हिमोडायलिसीस मशीनचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त राशिद फहीम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. कोकाटे बोलत होते.संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. मुरूडचे सुपुत्र सनाउल्ला घरटकर यांनी संस्थेला रुग्णवाहिकेसह तीन डायलिसिस मशीन्स दिल्या असून, 28 रुग्ण डायलिसीस सेवेचा लाभ घेत आहेत. आगामी काळात एचआयव्ही पॉझिटिव्ह तसेच हेपिटाईस बी या रुग्णांवरदेखील उपचार होऊ शकतील, अशी माहिती सुर्वे यांनी दिली. विश्वस्त राशिद फहीम यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम यांनी संस्थेला वॉटरकुलर, राजू जैन यांनी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि शमीम खतीब यांनी व्हीलचेअर भेट दिली. संजीवनी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम, वासंती उमरोटकर, नगमा खानजादे, जहूर कादिरी, नितीन अंबुर्ले, अजित गुरव, कीर्ती शहा, शशिकांत भगत, अशोक विरकुड, अमित कवळे तसेच अविनाश भौड, सुकन्या मोरे, कुणाल सुर्वे, राकेश चोगले, गीतांजली डांगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.