Breaking News

पनवेल बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन

काँग्रेसची यात्रा थांबविण्याची मागणी; निवदेन सादर

पनवेल ः वार्ताहर

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणावरून शुक्रवारी (दि. 18) पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

प्रथमेश सोमण यांच्यासह पनवेल संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, महिला आघाडीच्या महानगर संघटिका सुलक्षणा जगदाळे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे यांच्यासह महानगरातील इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला व जोडे मारून त्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे अधिकृत निवेदन देऊन काँग्रेसची महाराष्ट्रात सुरू असलेली भारत जोडो यात्रा लवकरात लवकर थांबावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. तहसीलदार विजय तळेकर यांनी या निवेदनाची दखल घेत शासनदरबारी पाठवणार असल्याचे आश्वासन दिले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply