कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना पाहिली असता डोंगरदर्या आणि पावसाळ्यात ओसंडून वाहणार्या नद्या यांनी संपन्न असलेला तालुका आहे. पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याच्या आणि सतत पाऊस कोसळत असेल तर नद्यांना पूर येण्याच्या घटना घडत असतात. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात राज्यमार्ग यांचे जाळे विणले गेले असल्याने रस्ते आणि रेल्वे यांच्याबाबत आपत्तीचे प्रसंग मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यावेळी पूर्वीचे अनुभव लक्षात येणार्या आपत्तीची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाले असून नैसगिर्क आणि मानवनिर्मित आपत्तीसामोरे जाण्यासाठी कर्जतचे प्रशासन सज्ज झाले आहे.
आपत्ती ही दोन प्रकाराची असते, त्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित, असे तिचे स्वरुप लक्षात घेता कर्जत तालुक्यात पावसाळ्यात ज्या आपत्ती येऊ शकतात आणि त्या दुर्दैवाने आल्यास त्यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचे नियोजन कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. सात वर्षांपूर्वी ज्यावेळी डोंगरपाडा धरण फुटून वाहून जात होते, त्या ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील एकही अधिकारी घटनास्थळी किमान दोन तास पोहचला नव्हता. हा अनुभव पाठीशी असल्याने निसर्गनिर्मित आपत्ती आल्यास कसे त्यास तोंड देता येईल, याचे नियोजन केले आहे. पावसाळ्यात नद्यांना पूर येणे आणि रस्ते वाहतूक बंद होणे, माथेरान या असलेल्या पर्यटकांची गर्दी असलेल्या ठिकाणी आपत्तीची स्थिती निर्माण झाल्यास काय करता यईल, यासाठी पोलीस आणि स्थानिक यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. आपत्तीची व्यवस्थापन करीत असताना शासनाने या काळात ठेवले जाणारे नियंत्रण कक्ष अधिक सतर्क असतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यात प्रामुख्याने निसर्ग निर्मित आपत्ती येत असते, मात्र मानवनिर्मित आपत्तीची स्थिती यापूर्वी आली नाही. मात्र आग, वणवे, जैविक, रासायनिक हल्ले झाले तर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याचे देखील नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नियंत्रण कक्ष देत आहे.
नैसर्गिक आपत्तीची येत असताना जोरात आणि सलग चार दिवस पाऊस सुरु असेल तर मग डोंगरातील माती ही ढिसूळ होते आणि त्यामुळे भूस्खनन होण्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे भूस्खनन होणारी संभाव्य गावे असलेल्या तुंगी, पेठ, ढक या लोकवस्ती असलेल्या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी कसे काढता येईल याचे नियोजन प्रामुख्याने करण्यात आले आहे. 2005 मध्ये तुंगी गावावर दरड कोसळली होती आणि त्यासोबत झालेल्या भूस्खनन यामध्ये त्या ठिकाणी असलेली माळरान आणि त्यावरील भातशेती ही माती त्यावर वाहून आल्याने दलदलीची बनली होती. तर शासनाने त्या गावावर आणखी एक दरड कोसळू शकते ही स्थिती लक्षात घेऊन तुंगी गावाचे स्थलांतरण करण्याचे आदेश दिले होते, मात्र डोंगरपाडा येथे कोणीही आला नाही. त्यामुळे तुंगी गावाचे नवीन जागेत पुनर्वसन काही झाले नाही. त्याचवेळी पाच वर्षांपूर्वी नेरळ येथे मोहाचीवाडी भागात माथेरान येथून वाहत येणार्या नाल्याच्या कडेला असलेल्या घराची भिंत कोसळली होती आणि त्यात चारजणांचा बळी गेला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस यांनी तेथील सर्व रहिवासी यांना नाल्यापासून अन्य जागेत स्थंलातरीत केले होते. मात्र महिन्याभरात पुन्हा ती सर्व कुटुंबे तेथे राहायला आली आहेत, अशी स्थिती सर्व ठिकाणी असून आपत्तीच्या काळात केलेले स्थलांतरण हे कायमस्वररूपी शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली आहेत. त्या त्या ठिकाणी राहणार्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
नेरळ मोहाचीवाडी आणि तुंगी येथील घटना ताज्या असताना देखील स्थानिक मंडळी आपली वहिवाट सोडून येण्यास तयार नसतात. त्यामुळे प्रशासनाने तुंगी, धाकी याशिवाय अंभेर पाडा तसेच भिवपुरी रोड जवळील पाली वसाहत येथील घरे ही दरडीच्या खाली बांधण्यात आली आहेत. त्यांना असलेला धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या सर्वांना सूचित केले आहे. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्षासहलीसाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील धरणे, तलाव, धबधबे आदी पाणवठे यांच्या ठिकाणी जाण्यास मागील तीन वर्षे सातत्यायाने बंदी घातली जाते. त्या ठिकाणी मौजमस्ती करतात आणि परिणामी आपले जीव गमावून बसतात. मग शासनाची जबाबदारी त्या ठिकाणी सुरु होते आणि बुडालेले, पाण्यात वाहून गेलेले यांचे शव सापडत नाही, तोवर आपत्ती व्यवस्थापन कामाला लागलेले असते. त्यामुळे यावर्षी देखील पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठे यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. जून 2018पासून मे 2019 पर्यंत कर्जत तालुक्यात पाण्याचे ठिकाणी किंवा किल्य्यांवर किमान 25 जणांचे बळी गेले आहेत.
शासन तालुक्यातील पाणवठे यांच्याकडे जाणारे रस्ते या ठिकाणी जमावबंदी लावत असते. पण तरीही हौशी पर्यटक हे ऐकत नाहीत आणि परिणामी त्यांना आवरायला दर शनिवार आणि रविवारी पोलिसांना पाचारण करून ठेवावे लागते. तर माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यावर नेरळ-माथेरान घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असतात. त्यामुळे पर्यटनाची वाहने अडकून पडतात आणि त्याचा पर्यटन व्यवसायावर होतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग नेरळ आणि दस्तुरी नाका येथे जेसीबी मशीन आणि रस्त्यावर पडणारे दगड उचलण्यासाठी डंपर ठेवून घेतात. अशी तयारी करणार्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्वाधिक सतर्क राहण्याचे सतत संततधार कोसळत असताना नद्यांना महापूर येण्याची भीती असते. त्यावेळी पोश्री, चिल्लार आणि उल्हास नदीच्या तीरावरील गावे यात पाणी शिरण्याचा धोका असतो. अशा शेलू,बिरडोळे, वावे, बेडसे, कर्जत आदी गावात लोकवस्तीत पाणी शिरू नये, यासाठी नद्यांची धोक्याची दर्शविणारी रेषा पाडण्यात आल्या आहेत. त्याचवेळी या नद्यांच्या काही पुलांवरून देखील महापुराचे पाणी जात असते. त्या पुलांबाबत देखील सूचना देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. गतवर्षी जामरूख येथील नदीवर पावसाच्या पाण्यासोबत झाड वाहून आले होते आणि त्या झाडाने पुलाचा एक भाग निकांमी केला होता. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन देखील प्रशासन अशी स्थिती निर्माण झाल्यास कराव्या लागणार्या उपाययोजना याबाबत आपल्या नियंत्रण कक्षाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यात जाणार्या रेल्वे मार्गावर पुणेकडे असलेल्या घाटमार्गात दरवर्षी पावसाळयात दरडी कोसळण्याचे घटना घडत असतात. त्यात काहीवेळा रेल्वे मार्गावर दरडी कोसळून मार्ग बंद होण्याचे प्रकार मागील वर्षी किमान तीन ठिकाणी झाले आहेत. यावर्षी तर पावसाला सुरुवाता झाली नसतानादेखील सायंकाळी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे यावर्षी संभाव्य आपत्तीचे नियोजन करताना रेल्वे विभागाला सामावून घेण्यात आले होते. मध्य रेल्वेने यावर्षी पावसाळ्यातील चार महिने लोणावळा आणि कर्जत येथे रेल्वे स्थानकात आपली खास तुकडी बसवून ठेवली आहे. या तुकडीने बोरघाटात काही दुर्घटना घडल्यास किंवा आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ कर्मचारी वर्ग उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे अल्पावधीत मार्ग सुरु होण्यासाठी कार्यवाही करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. तर रस्ते मार्ग महापूरचे पाणी रस्त्यावरून वाहून जाऊन बंद होऊ नयेत, यासाठी देखील प्रशासनाने कर्जत, नेरळ, माथेरान कशेळे अशा मध्यवर्ती ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करून लक्ष ठेवणार आहे.
याशिवाय शेतीमध्ये पावसाअभावी आणि भरपूर पाउस झाल्यास होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन आपत्तीची स्थिती आल्यास काय करता येईल, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कर्जतचे प्रशासन हे निसर्ग निर्मित आपत्तीसाठी सज्ज असून कोणत्याही स्थितीत मोठी दुर्घटना घडल्यास आपत्ती नियंत्रण कक्ष शक्य तितक्या लवकर आपली सेवा देण्यासाठी सज्ज असेल, असा निर्धार आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे.
-संतोष पेरणे