Breaking News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महर्षी वाल्मिकी शाखेचा वार्षिक उत्सव उत्साहात झाला. शहरातील गोखले सभागृहामध्ये शनिवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. आशिष गांधी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधन गतिविधी कोकण प्रांत कार्यकारणी सदस्य श्याम नानाजी देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संघाची ही शाखा पनवेल मधील गोखले हॉल समोरील गांधी उद्यानात रोज सकाळी सात ते आठ या वेळात भरते. अनेक प्रकारचे श्वसन व्यायामाचे प्रकार, शारीरिक व्यायाम, सूर्यनमस्कार, मनोरंजक खेळ, बौद्धिक कार्यक्रम इत्यादी गोष्टी रोज नित्याने केल्या जातात. तसेच समाजोपयोगी विविध उपक्रम ही शाखा राबविते. या सर्व गोष्टी समाजातील सगळ्यांपर्यंत पोहचाव्या म्हणून हा वार्षिकोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी शाखेचे हे सर्व विविध उपक्रम पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्वरूपात स्क्रीनवर सादर करण्यात आले. 16 डिसेंबरला ढाका युद्धविजय दिवशी या शाखेतील वय वर्ष 60 च्या पुढील ज्येष्ठांनी तरुणांप्रमाणे 1540 दंड प्रहार मारले. विशेष म्हणजे या शाखेतील 81 वयाच्या व बायपास झालेल्या एका स्वयंसेवकांनीसुद्धा प्रहार मारले. या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो पुरुष व महिला उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमात टाळीयोग व दंडयोग प्रात्यक्षिके झाली. या कार्यक्रमात नेपाळमध्ये जाऊन विविध आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवणार्‍या वाल्मिकी नगर मधील सनी टाक यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सर्व नागरिकांना उपयुक्त अशा विविध सेवा देणार्‍यांची संपर्क सूची कामाला हात-हाताला काम ही वितरित करण्यात आली. या वेळी डॉ. आशिष गांधी म्हणाले की, संघामधून दोन गुण शिकण्यासारखे आहेत एक म्हणजे संघाची शिस्त आणि दुसरे म्हणजे संघातील स्वयंसेवकांचा समर्पण भाव. असे सांगतानाच  या शाखेचे उपक्रम खूपच वाखाणण्यासारखे आहेत हेसुद्धा त्यांनी नमूद केले. समारोपाच्या कार्यक्रमात श्याम नानाजी देसाई यांनी, संघाच्या इतिहासातील स्थित्यंतरे विषद केली. आणि ते म्हणाले की समाजात अनेक पंथ आढळतात त्यामध्ये देवभक्ती शिकवले जाते आणि संघामध्ये देशभक्ती शिकविली जाते. संघ हा अनेकवेध संकटातून मार्ग काढीत आला आहे व आज संघाच्या माध्यमातून जवळपास पावणे दोन लाख सेवाकार्ये देशभरात सर्व दूर चालतात आणि साधारणतः 65 हजार शाखा सुरू आहेत. हे सर्व करत असताना संघ आणि समाज एकरूप होऊन काम करत आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply