निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्रे व गुटख्याची वाहतूक
खालापूर ः प्रतिनिधी
खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगांव आणि देवन्हावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. 18) झाली. या निवडणुकीदरम्यान खोपोली पोलिसांनी अवैधरित्या शस्त्रे व गुटख्याची वाहतूक करणार्या एकाला अटक केली आहे. मतदानाच्या दिवशी रविवारी एक सफेद स्कॉर्पिओ (क्र. एमएच 05 एएक्स 6201) ही साजगांव व सारसन या भागामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी गस्ती पथकास त्वरीत या स्कॉर्पिओचा शोध घेण्यास सांगितले. पोलिसांना ही स्कॉर्पिओ जीप ताकई-आडोशी रस्त्याला दिसल्याने त्यांनी जीपचा पाठलाग सुरू केला. अखेर पेण-खोपोली रस्त्यालगत असणार्या ए रेहमान ऑटो गॅरेजच्या पाठीमागे जीप पोलिसांनी अडविली आणि जीपचालकाला ताब्यात घेतले. जीपमध्ये 73 हजार 128 रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटखा, एक नकली बंदूक आणि तीन तलवारी असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्वरीत चालक जमील इस्तियाक खान (वय 30, रा. हाळ नंबर 02, खालापूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान खोपोली पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सहा लाख 26 हजार 628 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम, हवालदार सागर शेवते, नाईक सतिश बांगर, कॉन्स्टेबल कादर तांबोळी यांनी सहभाग घेतला असून या कामगिरीबद्दल वरिष्ठांनी खोपोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे.