पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली.
पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या अध्यक्षपद निवडीच्या बैठकीस निवडणूक निर्णय निरीक्षक तथा माजी आमदार विनय नातू, उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, अविनाश कोळी, चिटणीस दीपक बेहेरे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रांत पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध सेलचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही काम करेन, असे सांगितले; तर उपस्थितांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अॅड. महेश मोहितेंकडे दक्षिणेची धुरा
अलिबाग : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी अॅड. महेश माहिते यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय निरीक्षक, माजी आमदार विनय नातू यांनी अॅड. मोहिते यांची निवड बैठकीत जाहीर केली.
भाजपने रायगड जिल्ह्याचे संघटनात्मक दक्षिण रायगड व उत्तर रायगड असे दोन विभाग निर्माण केले आहेत. दक्षिण रायगड कार्यकारिणीची पहिली बैठक मंगळवारी अलिबागमधील हॉटेल रविकिरण येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उत्तर जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सहनिवडणूक अधिकारी वाय. टी. देशमुख, अविनाश कोळी, दीपक बेहेरे, बिपीन म्हामूणकर, संजय कोनकर, कृष्णा कोबनाक, प्रकाश धुमाळ, अमित जाधव, सतीश लेले, हेमंत दांडेकर, अमित घाग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा क्षेत्रफळाने फार मोठा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे संघटनात्मक दोन विभाग व्हावेत, ही पूर्वीपासूनची मागणी होती. त्यानुसार आता रायगडचे संघटनात्मक दक्षिण व उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्हा अध्यक्ष म्हण्ाून मी काम केले आहे. त्या वेळी सर्वांचे सहकार्य मिळाले. यापुढेही या नवीन विभागात काम करण्यासाठी येतच राहीन, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
पद घ्या, पण पक्ष संघटनेसाठी वेळ द्या. मला पाहिजे तसे काम करेन असे न करता पक्षाला पाहिजे तसे काम करून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले.
नवीन विभाग निर्माण झाल्यामुळे संघटन बदलले आहे. नवीन अध्यक्ष मिळाला आहे. तालुका अध्यक्ष नवीन येतील. त्यामुळे जबाबदारी वाढणार आहे. उत्तर व दक्षिण हे दोन विभाग संघटनेचे काम करण्यास सोपे व्हावे म्हणून तयार केले आहेत. असे असले तरी दोन्ही विभागांतील पदाधिकार्यांनी एकत्र येऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करायला हवे, असे विनय नातू म्हणाले.
सर्वांना सोबत घेऊन मी पक्ष संघटना मजबूत करेन, असा निर्धार नवनिर्वाचित दक्षिण जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी व्यक्त केला.